सकाळी १० वाजताच माझा वर्तमानपत्रातील लेख वाचून अक्षयने मला फोन केला. सर भेटायचे आहे आपली वेळ हवी आहे ठरल्याप्रमाणे ५ वा. अक्षय मला ध्यान केंद्रावर भेटायला आला.
अक्षयचे डोळे आत गेलेले, चेहऱ्यावर निस्तेजता, गाल आत गेलेले, खांदे वाकलेले, आवाज खोल गेलेला, नैराश्याची बरीचशी लक्षणे त्यात दिसून येत होती. तो सारखा काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता. बहुधा देवाचा नामजप करत असावा.
मी त्याच्याशी बोलणे चालू केले, तेव्हा अक्षय म्हणाला सर, एका मुलीबरोबर माझे प्रेमसंबंध होते पण तिच्या घरच्यांनी तिचे लग्न बळजबरीने त्यांच्याच नात्यातील एका मुलाबरोबर लावून दिले. तिने मला अंधारात ठेवून माझी खूप प्रतारणा केली व तिच्या घरच्यांनीही मला खूप त्रास दिला हे दुःख विसरण्यासादी मी एका गुरूच्या आश्रमात गेलो तेथे त्यांनी मला दीक्षा दिली. गुरूमंत्र दिला मी आता आश्रमातच राहतो व गुरूमंत्र म्हणतो, मला आश्रमाच्या चौकटीत नियमात रहावे लागते. बाहेर फिरण्यास मनाई असते. रोजचे तेच रूटीन व सतत मंत्रजप करून करून मला उदास वाटतेय व्याकुळता येतेय, मन उद्वीग्न होतंय. चौकटीचा खूप कंटाळा आलाय, मनात कामभावना प्रकट होतात. पण “ब्रम्हचर्य हेच जीवन” हे गुरूने मनावर इतके बिबवले की मी माझ्या सर्व कामभावना दाबून टाकतो. हस्तमैथून म्हणजे वीर्यनाश, म्हणजेच मृत्यू. या गुरूजींच्या शिकवणीने भय उत्पन्न झाले आहे. मन बाहेर ओढ घेतेय मी त्याला चौकटीत ठेवतोय.गुरुजी मला खूप उदास व निराश वाटतेय.
मित्रांनो पूर्वी गाणी ऐकणे, सिनेमा पहाणे, हॉटेलिंग करणे, डान्स करणे, मित्रांचरोबर सहलीला जाणे, मैत्रिणीबरोबर फिरणे, चांगला आहेस विहार, भावनांचं व्यवस्थापन करणारा अक्षय आश्रमाच्या चौकटीत स्वताला दाबून कोडून ठेवू लागला मंत्राचे तरंग सामर्थ्य प्रचंड असते त्याचाही अतिरेक झाला व त्याच्या शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. भावना दमनामुळे नकारात्मक तरंग व दबलेल्या भावभावना उचंबळून आल्या व नकारात्मक विचारांमुळे नकारात्मक तरंगाशी अक्षय ट्युन होऊ लागला नकारात्मक विचारांमुळे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन झाले व स्वभावधर्माच्या विरोधात अर्थात निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे अक्षयला डिप्रेशन आले होते.
मित्रांनो आपल्या मनात अनेक इच्छा, वासना, प्रेरणा, नैसर्गिक स्वरूपात निर्माण होतात आपण त्या इतरांपुढे व्यक्त करणे शिष्टसंमत नसल्यामुळे दाबून टाकतो आपण दडपलेल्या इच्छा सहजासहजी नष्ट होत नाहीत स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी त्या वारंवार प्रकट मनाकडे झेपावत राहतात. पण दडपणामुळे- सामाजिक बंधनाच्या अविवेकी दृष्टीकोनामुळे, प्रकट मन त्या इच्छांना ठोकरते व त्यांचे दमन होते. दमन केल्यावर त्या मनातून नाहीशा झाल्या अशी चुकीची आपली समजुत असते.
प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या ना कुठल्या इच्छांचं दमन करत असते. हे दमन खूप तीव्र प्रमाणात व अजाणता असेल तर ते अबोध मनाला न जुमानता संधी मिळताच मनोविकृतीच्या रूपाने वर येते.
मनोविश्लेषण शास्त्रानुसार मानसिक विकृतीचे मूळ हे प्रामुख्याने अबोध मनात दडपलेल्या कामभावनांचे आक्रमन हे असते. अक्षय हा मुळातच अध्यात्मिक प्रवृत्तीचा नव्हता. तो अपघाताने अध्यात्माकडे वळला म्हणून – आश्रमात आला होता. आश्रमात त्याने सर्व भावभावना दाबून टाकल्या होत्या त्यामुळे दबलेली उर्जा केमिकल लोच्याच्या रूपाने अक्षयला नैराश्याकडे घेऊन गेली होती.
मी अक्षयला जे वाटतंय ते बिनधास्त बोलायला लावले. त्याला आश्रमातून काही दिवस बाहेर पडून सिनेमा, मित्रमंडळी, मैत्रिणी, सहल,उत्तम आहार, योगा, प्राणायाम, ध्यान, यात सामील व्हायला लावले व सर्व भावभावनांचे व्यवस्थापनशास्त्र सांगितले. अविवाहीतांसाठी हस्तमैथून हा वासनापूर्तीचा व ताणतणाव निवारणाचा योग्य मार्ग आहे. फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये. त्याने कसलाही अपाय होत नाही हे त्याला समजावून सांगितले. विचाराचे महत्व सांगताना, नकारात्मक विचार नकारात्मक तरंगाशी आपल्याला जोडतो व नकारात्मक विचारामुळे अहितकारक स्वाव, उच्च्चरक्तदाब यामुळे आपली हानी कशी होते हे पटवून दिले व नकारात्मक विचारांना सकारात्मक करून मनाला सकारात्मक विचारांचे खाद्य स्वसंवादातून द्यावयास सांगितले आणि दहा दिवशीय विपश्यना शिबिरात बसवले. शिबीरानंतर अक्षय मोकळा झाला. आज तो नोकरी करून मजेत जगतोय. नुकतेच त्याचे लग्न ठरलेय. पत्रिकेत गुरूवर्य म्हणून प्रेषकाच्या कॉलममध्ये माझे नाव झळकते आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
