चारित्र्य ही इतकी सार्वजनिक गोष्ट झाली आहे, त्यातही मुली महिलांच्या चारित्र्याविषयी तर कोणीही सहजपणे काहीही वक्तव्य करत सुटते त्यात आपल्याकडल्या विचारसरणीनेही त्यात भरच घातली आहे मुलीचे चारित्र्य म्हणजे काचेचे भांडे, जरा धक्का लागला तर तडकू शकते वगैरे त्यामुळे जरा धाडसी, बडबडी मुलगी असली की तिच्याबद्दल कानगोष्टी सुरू व्हायला वेळ लागत नाही. नात्यातले म्हणू नका की ओळखीचे व्यक्ती सहजपणे मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतात, निंदा करतात.
अशीच सवय होती गुलाबला. त्याच्या ग्रुपमधल्या, नात्यातल्या स्त्रियांच्या चारित्र्यावर त्यांच्यामागे तो निंदा करायचा. याच गुलाबची मुलगी परप्रांतीय तरुणाबरोबर पळून गेली व तिने त्याच्याशी विवाह केला गुलाबच्या हे पचनी पडणार नाही हे ती जाणून होतीच, त्यामुळे तिने पोलिसात, माझ्या नवऱ्याला वडिलांपासून धोका आहे अशी रीतसर तक्रारही केली पोलिसांनी गुलाबला बोलावून घेत समज दिली. या सर्वाने घाबरलेला गुलाब घरी येऊन ढसाढसा रडल्याचे कळले.
मित्रांनो, आपण मागे पाहिलेच की आपण जे बोलतो, विचार करतो तेच खरे होते, थोडक्यात आपलेच बोलणे आपल्याला फळते. गुलाब इतर स्त्रियांची निंदा व बदनामी करायचा. तेच त्याच्याकडे परत आले आणि त्याचीही बदनामी झाली. गुलाबचे वाचिक कर्म त्याच्याकडे परत आले.
कर्माचे फळ मिळतेच. तेव्हा सत्ता, पैसा, ताकदीचा वापर करून कुठलेही दुष्कर्म करू नका.
कर्म हे रबरासारखे असते, जसे तुम्ही त्याला ताणाल तसेच ते तुमच्याकडे परत येते.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
