बऱ्याच वेळेला भौतिक जगामध्ये काही अध्यात्मिक माणसे अध्यात्माचा लेबले लावून स्वतःला अध्यात्मिक म्हणून घेतात परंतु एकमेकांचा आकस करताना दिसतात. त्याचप्रमाणे क्रोध, मोह, लोभ व षडरिपू यांच्यात अति प्रमाणात दिसून येतात मग बऱ्याचदा इतरांना प्रश्न पडतो की, ही व्यक्ती स्वतःला अध्यात्मिक म्हणून घेते. मग ही अशी का वागते ?
मित्रांनो, याबाबतची जुनी कथा मुद्दाम सांगावीशी वाटते. व पुराणाचा खूप अभ्यास केलेला एक साधक राजाकडे गेला व राजाला म्हणाला, ‘महाराज, आपल्याला शास्त्रपुराण ऐकण्याची इच्छा आहे का? मी तुम्हाला पूर्ण शास्त्रपुराण समजून सांगतो. ज्यामुळे तुम्हाला मुक्तीचा रस्ता मिळू शकेल. पण त्या बदल्यात मला एखादे पद व इनाम म्हणून काही धन द्यावे, अशी माझी इच्छा आहे.’ हे वाक्य ऐकताच राजा त्या साधकाला बोलला, ‘परत एकदा शास्त्र पुराणांचा अभ्यास करून ये’ दरबारात मोठेपण व संपत्ती राजाकडून त्याला हवी होती म्हणून तो परत पुराणांचा अभ्यास करून आला व राजाला पुन्हा तेच म्हणाला, राजा त्याला पुन्हा बोलला, ‘आणखी एक वेळा जा आणि व्यवस्थित अभ्यास कर.’ मग साधकाने परत अभ्यास चालू केला व पुराणाची खोली त्याच्या लक्षात आली, साधकाच्या लक्षात आले, कीर्ती, धन व मानसन्मान यापेक्षा शाश्वत सुख वेगळे आहे. हे साधकाला कळल्यानंतर तो आत्मज्ञानात खोली वाढण्यासाठी ध्यानधारणा करू लागला. त्याच्या मनाची शुद्धता होऊ लागली. हळूहळू विकार कमी होऊन, आसक्ती, प्रतिष्ठा व पैशाविषयीची ओढ राहिली नाही व परत राजाकडे काही मागण्यासाठी गेलाच नाही.
मित्रांनो, पांडित्य व विद्वत्ता या गोष्टी आत्मज्ञानापेक्षा भिन्न आहेत. आत्मज्ञान मिळालं त्या वेळेला साधकाला पैसा व कीर्ती याची किंमत फार नाही, हे हळूहळू समजू लागते. चला तर मग आपण सर्वजण आत्मज्ञानाचा शोध घेण्यासाठी ध्यानधारणा करूया. ज्ञानाच्या अनेक पद्धतीमध्ये विपश्यना नावाची शास्त्रोक्त पद्धत अत्यंत उपयोगी आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
