तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करत राहिला, स्वतःच्याच विश्वात रमत राहिला, तर नैराश्य तुमच्याकडे येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आनंदी राहायचं असेल तर इतरांना देता येईल तेवढा आनंद द्यायला शिका. अगदी साधी गोष्ट आहे. आपल्या घरात कामाला आलेल्या बाईला तुम्ही प्रेमाने आपण केलेलं जेवण खाऊ घातलं. त्यावेळेस पहा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला भरपूर काही सुख देऊन जाईल. कधीतरी पाच मिनिटं तिच्याजवळ बसून तिची थोडी आत्मीयतेने चौकशी करून तिला मदत करण्याचं आश्वासन देऊन तर बघा. रस्त्याने जाताना एखाद्या चांभाराकडे आपण चप्पल शिवून घेतो. बूट पॉलिश करून घेतो. कधीतरी त्याच्या जवळ बसून आपुलकीने त्याची चौकशी करा. भाजीवाल्याजवळ बसून त्याला चार पैसे जास्त देऊन आपलेपणाने त्याच्याशी थोड्या गप्पा मारून बघा. ही मंडळी आपल्या मनातल्या काही गोष्टी सांगण्यासाठी आतून व्याकुळ आहेत, परंतु त्यांचं ऐकून घेणारी लोकं त्यांना भेटत नाहीत. त्यामुळे कधीतरी थोडा वेळ काढून त्यांच्याजवळ बसून त्यांचं ऐकून घ्या. त्यांना प्रेमाचे चार शब्द, सांत्वनाचे चार शब्द, मदतीचे चार शब्द द्या. पण नुसते शब्द देऊन थांबू नका; तर खरोखोरी त्यांना मदत करा. तुम्ही जे काही लोकांना देता ते कित्येक पटीने तुमच्याकडे येते. दारात आलेल्या पोस्टमनला कधीतरी पाण्याचा एखादा ग्लास द्या. चहा तयार असेल तर त्याला चहा पाजा. कधीतरी वाटलंच तर थोडीफार मानधन द्या. थोडीफार त्याची आत्मीयतेने चौकशी करा. विचारा सायकलवर उन्हात, थंडीत, पावसात तुमची पत्रं घेऊन येत असतो. तेव्हा त्याच्या उदरनिर्वाहासाठी तुमच्याकडे भरपूर असेल तर, थोडीफार त्यांच्या मुलांसाठी जी काही मदत लागत असेल, ती करून तर बघा. भले ती पुस्तके, नोटबुकच्या रुपाने असो. ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारची कामे करू लागाल, त्या वेळेला ऑटोमॅटिक तुमचे मन प्रसन्न होत राहील आणि प्रसन्न मन नैराश्याला कधीच जवळ करणार नाही. जगाला सुधारण्यासाठी तुम्हाला समाजसुधारक व्हायची गरज नाही. आधी आपल्या जवळपासच्या दुनियातली ही छोटी-छोटी मंडळी यांच्यासाठी काम करा. जवळपासची दुनिया सुधारा. ऑटोमॅटिक तुमचे आयुष्य सुधारेल. या प्रकारच्या दृष्टिकोनाला उदात्त स्वार्थ असं म्हणतात. एका तत्वेत्यानं म्हटलं होतं, ‘दुसऱ्याचं भलं करणं, हा एक स्वार्थच आहे. त्यामुळे आपलंही भलं होत असते.’
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
