इतरांची काळजी घ्या

लहानपणी मला आठवते तेव्हा आम्ही रेल्वेकॉर्टस्मध्ये राहत होतो वडील रेल्वेत कामाला होते. जुन्या पद्धतीची ब्रिटिशांच्या काळी बांधलेली बैठी घर, एकमेकांना चिकटून होती. थोडक्यात, त्याला जुने वाडेच म्हणूया. परिस्थिती गरिबीची होती वडिलांनी सांगितलं होतं, ‘पोरा खूप अभ्यास कर आणि मोठा हो.’ त्यामुळे लहानपणापासून अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देत होतो. पण घरात अभ्यास करत असताना, आमच्या घराच्या बाजूला असणाऱ्या घरात एक कुटुंब परप्रांतीय होतं. आणि ते घरामध्ये जोरजोराने रेडिओ लावायचे. त्यांचा रेडिओ सारखा चढ्या आवाजात चालू असायचा. त्यामुळे आम्हा बहीण, भावांना अभ्यासात व्यत्यय यायचा. माझ्या आईने त्यांना सांगितल्यानंतर त्या घरातील बाई माझ्या आईला म्हटली होती, ‘हमारे घर मे हम कुछ भी करेंगे.’ आणि ते रेडिओचा आवाज तसाच चालू ठेवायचे. शेवटी मी जवळच असलेल्या नदीकिनारी जाऊन झाडाखाली अभ्यास करत बसायचो. आज विद्येची उपासना केल्यामुळे बऱ्याचदा पेपरमध्ये माझे फोटो छापून आलेले ती लोकं पाहतात. मला फोन करून त्यांच्या मुलाला कामाला लावण्याचा आग्रह करतात. मी निश्चितच त्यांना मदत करणार आहे. परंतु त्यांनी दिलेला त्रास मला आजही आठवला की महात्मा गांधीची एक गोष्ट आठवते.
म. गांधी ससून हॉस्पिटलमध्ये असतानाची गोष्ट. एकदा सुप्रसिद्ध गायक दिलीपकुमार रॉय त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले. पद्मजा नायडू यांनी त्यांना गांधीजीसाठी गाण्याचा कार्यक्रम कराल का? असे विचारले. त्यावेळी ‘तो माझ्या कलेचा गौरव होईल.’ असे दिलीपकुमार रॉय म्हणाले.
त्यांनी गांधीजीना विचारले. गांधीजीना गाणे ऐकायला खूप आवडत असे. त्यांनी आपण गाणे ऐकण्यास उत्सुक आहोत असे दाखविले. पण ते दिलीपकुमार रॉयना म्हणाले, ‘अगोदर येथील परिचारिकेची परवानगी काढा. जवळच इतर आजारी लोक आहेत. वेदनेनं त्रासलेले आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. आपल्या या कार्यक्रमाचा थोडासाही त्रास त्यांना होता कामा नये.’ त्यामुळे सगळ्यांना विचारा, सगळ्यांची मान्यता असेल तरच कार्यक्रम करा.
मित्रांनो, गोष्टीचे तात्पर्य एवढेच, आपल्या कोणत्याही गोष्टीचा इतरांना जराही त्रास होणार नाही, याची सतत काळजी घ्या. जे तुम्ही लोकांना देता, ते कित्येक पटीने तुमच्याकडे येते हे लक्षात ठेवा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!