स्वामी विवेकानंदाच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्या मार्गारेट नोबलला सापडलेला विवेकानंदाच्या डायरीत त्यांनी स्वहस्ते लिहिलेली एक टीपणी आजही युवकांना, भारतवासीयांना त्यांच्या अध्यात्मिक बलाची अनुभूती देत आहे
ती पुढीलप्रमाणे:
४ जुलै १९०२ रोजी मी या जगाचा निरोप घेईन. माझे गुरु मला बोलवत आहेत. मला जे कांही कार्य करायचं आहे, ते व्यवस्थित पार पडले आहे ४ जुलै १९०२ रोजी स्वामी विवेकानंद उर्फ नरेंद्र विश्वनाथ दत्त जातोय खरा परंतु माझ्या विचारांच्या प्रेरणेतून या भारतभूमीवर हजारो विवेकानंद तयार होतील तेच या राष्ट्राचा उद्धार करतील विवेकानंदाच्या विचाराची शक्ती युगानुयुगे भारतवासीयांना प्रेरणा देत राहील.
बलोपासना :
उन्नत जीवनासाठी विवेकानंदानी सर्वप्रथम शरीरबलाची उपासना करण्याचा मंत्र दिला. अमेरिकेतील एका भाषणात ते म्हणाले, “माझ्या प्रिय मित्रांनो रोज मैदानांवर जा, खेळ खेळा, वासरासारखं हुंदडा, व्यायाम करा जेव्हा तुम्ही सबल आणि सशक्त व्हाल तेव्हा तुम्हाला भगवद्गीता चांगल्या प्रकारे समजू शकते, कारण बल हेच जीवन आणि दुर्बलता म्हणजेच मृत्यू.” हजारो श्रोत्यांनी उभे राहून हात उंचावून त्यांच्या या वाक्याला आवेशपूर्ण दाद दिली. विवेकानंदाचा सुदृढ शरीरयष्टीचा संदेश आचरणात आणण्याची आज खऱ्या अर्थान गरज आहे ते म्हणतात, “तासनतास मंदिरात उभे राहून घंटा वाजवण्यापेक्षा, मैदानावर फुटबॉल खेळून शरीरयष्टी कमावणारा युवक चटकन परमेश्वराच्या निकट पोहोचू शकतो “.
आत्मविश्वास :
विवेकानंदांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे की, ३३ कोटी देवांवर तुमचा विश्वास असेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही नास्तिक आहात. एकदा कन्याकुमारीला विवेकानंद त्या विराट महासागराच्या किनाऱ्यावर थांबले समुद्राच्या मध्यभागी असलेला भलामोठा काळादगड त्यांनी पाहिला नावाड्याला तेथे नेण्याची विनंती केली पैशाअभावी नावाड्यांने त्यांना बोटीत बसु दिले नाही स्वामीजीनी त्याक्षणी आपल्या भगव्या वस्त्रानिशी समुद्रात उडी घेतली, समुद्राला भरती आली होती. स्वामीजीच्या अंगावर लाट आदळून ते दूर फेकले जात होते. नाका, तोंडात पाणी जात होतं. पुन्हा प्रचंड आत्मविश्वासाने ते पुढे पुढे पोहत जात होते. लाट छातीवर आदळून स्वामीजीना म्हणत होती पोरा मागे फिर मी तुला सीमेपर्यंत पोहचू देणार नाही, मी तुला खाऊन टाकीन. स्वामीजींचा आत्मविश्वास म्हणत होता, ज्यांच्या पराक्रमाला सीमा नाही तो विवेकानंद मी आहे, अगं लाटे तू काय मला खाणार? मीच तुला पिऊन टाकीन. अशा प्रचंड आत्मविश्वासाने ते त्या काळ्या दगडावर पोहचले. मनाच्या आत्मविश्वासाची केवढी ही ताकद.
निर्भयता :
एकदा वाराणसीला जाताना विवेकानंदाच्या मागे काही माकडे लागली, घाबरून विवेकानंद पुढे पळू लागले. विवेकानंद जेवढ्या जोराने पळू लागले तेवढ्याच वेगाने ती माकडे त्यांच्या मागे पळू लागली. अशा अवस्थेत एका अनोळखी माणसाने जोरात ओरडून स्वामीजींना सांगितले, अरे पळतोस काय मागे वळ व त्या माकडांना तोंड दे. त्या क्षणी स्वामीजी थांबले. मागे वळले व माकडांच्या दिशेने फिरून पुढे सरकले तेव्हा ती माकडे लांब पळून गेली. स्वामीजींनी जगाला उपदेश केला आयुष्यात जर अशा भयावह गोष्टी संकटे आली तर त्यांना तोंड द्या. म्हणजे ती दुर निघून जातील.
सांधिक कार्य टिमवर्क :
या पृथ्वीवर कुठलाही एक माणूस मोठे कार्य करू शकत नाही त्यासाठी त्याला संघाची गरज असते. संघ बांधणीसाठी माणसे जोडणे महत्त्वाचे असते जी माणसे एका वर्षाचा विचार करतात ती शेतात बी बीयाणे लावतात जी दहा वर्षाचा विचार करतात ती झाडे लावतात व जी आयुष्याचा विचार करतात ती माणसे माणसे जोडतात. एकदा स्वामीजीचों वाट बघत असंख्य साधक बसले होते स्वामीजीचे प्रवचन होणार होते आगमन झाल्या झाल्या समोर बसलेल्या श्रोत्यांना उद्देशून स्वामीजी म्हणाले आज मी एकीच्या प्रेमात पडलो आहे. सर्व सभा अवाक होऊन विचार करू लागली. अशी कोण भाग्यवती ‘लावण्यवती अप्सरा’ आहे जिच्या प्रेमात विवेकानंदासारख्या राजबिंडा योगी पुरूष पडला आहे. स्वामीजींनी सभेवर कटाक्ष टाकत म्हटले ती म्हणजे ‘संघटना’ होय. ती म्हणजे ‘टीम’ होय.
संघटनेमध्ये माणसांची मने जिंकून मानवी संबंध सुधारण्यासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी हे करून पहा:
१) एकमेकांना समजावून घ्या. २) संयम पाळा. ३) योग्य संधीची वाट पहा. ४) एकमेकांशी जवळीक साधा. ५) माणसे जोडा. ६) रोज व्यायाम व ध्यान धारणा करा. ७) आहार-विहार नियंत्रित ठेवा. ८) रोज वाचन करा. ९) हत्या करू नका. १०) चोरी करू नका. ११) व्यभिचार करू नका. १२) व्यसन करू नका. १३) खोटे बोलू नका. १४) नेहमी सत्कर्म करा. १५) दुसऱ्याला मदत करायला शिका.
संघामधील उत्तम मानवी संबंधासाठी खालील गोष्टी पाळा :
१) दुसऱ्याला समजून घ्या. २) जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐका.
३) एकमेकांचा आदर बाळगा. ४) माणसाने माणसांशी माणूसकीनं वागा. ५) आपल्या आयुष्याचे ध्येय विसरू नका. ६) समस्या स्वतःपासून सुरू होतात हे जाणून घ्या. ७) स्वतःस अंतर्बाह्य तपासा.
नैतिक मूल्य सांभाळा :
माणसाने मरणाची भिती न बाळगता चुकून ही माझा पाय वाईट दिशेला जाणार नाही याची भिती बाळगली पाहिजे. अमेरिकेत एकदा स्वामीजींच्या भाषणानंतर एक स्त्री स्वामीजीवर मोहीत होऊन स्वामीजींना म्हणाली, “स्वामीजी तुम्ही माझ्याबरोबर लग्न कराल काय?” अत्यंत अप्सरेसमान लावण्यवती ऎश्वर्यसंपन्न अशा त्या स्त्रीला स्वामीजी म्हणाले, “मुली मी संन्यासी, ‘लग्न’ हा शब्द माझ्या शब्दकोशातच नाही तरी पण तू ही ईच्छा का व्यक्त करतेस?” त्या वेळेस ती स्त्री स्वामीजींना म्हणाली, “स्वामीजी तुमच्या सारखा राजबिंडा देखणा, हुशार, योगीपुरूष माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून मी ही इच्छा व्यक्त करीत आहे.” त्याक्षणी स्वामीजी त्या मुलीला-स्त्रीला म्हणाले, “माझ्या सारखा देखणा हुशार राजबिंडा योगी तुझ्या पोटी जन्म घ्यावा असे तुला वाटत असेल तर आजपासून तू मलाच आपला पुत्र मान.” असे म्हणत स्वामीजी ‘आई’ म्हणून तिच्या पाया पडले, मातृदेवोभव, पितृदेवोभव म्हणणारे आजचे युवक स्वामीजीचा हा आदर्श घेऊ शकतील का?
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
