अभिजित हा सुसंस्कृत, सुशिक्षित, उच्चकुलीन राजघराण्यातील नामांकित युवक, लग्न लवकरच झाल्याने त्याला संततीही लवकरच झाली. संस्कारक्षम घर पण त्याला दृष्ट लागली. अभिजितच्या एकुलत्या एका मुलीने पळून जाऊन घरच्यांना कळू न देता परजातीतील मुलाशी रजिस्टर्ड विवाह केला व ती त्याच्याबरोबर राहू लागली. या घटनेमुळे नातेवाईक, सोसायटी आणि कारखान्यामध्ये या गोष्टीची चर्चा भलतीच रंगू लागली. या लोकनिदेच्या विचाराने अभिजित त्रस्त झाला लोकनिंदेच्या भयाने तो लोकांपासून दूर गेला व घरात एकट्याला कोंडून घेऊ लागला अतिविचाराने त्याला नैराश्य आले होते. यातून बाहेर पडण्यासाठी मित्राने त्याला ध्यानवर्गासाठी आणले होते खरोखर मित्रांनो “सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग” । हे अभिजितकडे पाहिल्यावर मला तंतोतंत पटले. अभिजितच्या कौन्सलिंगनंतर ध्यान शिबिर पूर्ण झाले व लोकनिंदेला सहजपणे तोंड देण्याची त्याच्या मनाची सकारात्मक तयारी झाली.
मित्रांनो ज्यांच्या वाट्याला जननिंदा आलीच नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. निदा ही एक लोकप्रतिक्रिया असते. आपले विचार किंवा जीवनपध्दती त्यांना मान्य नाही व आपल्या तोंडावर बोलण्यास जे असमर्थ आहेत, अशा व्यक्तींचा आपल्याविषयीचा प्रतिकूल अभिप्राय म्हणजे लोकनिंदा अशा लोकनिंदेचा परिणाम आपल्यावर किती करून घ्यावयाचा हे आपल्याच हातात असते निंदेला तोंड देणे हे आपल्या हातात असते पण निंदकाचे तोंड बंद करणे हे अशक्य असे काम असते.
श्री अक्कमादेवी नावाची एक विरशैव संत कवयित्री एक तपस्विनी होती. तिच्या शिवभक्तीची लोकांनी थट्टा व निंदा केली पण त्यामुळे ती अजिबात ढळली नाही. ती म्हणत असे “वनात घर करून हिंस्त्र पशूना भिऊन कसे चालेल? समुद्रकिनारी घर करून लाटांना भिऊन कसे चालेल? व बाजारात घर करून आवाजाला भिऊन कसे चालेल? चन्त्र मल्लिकार्जुन देवा या लोकी जन्मल्यावर तुझी स्तुती, निंदा झाली तरी मनात क्रोध न बाळगता समाधानी राहण्यास शिकले पाहिजे. आम्माचा हा मंत्र आपण आचरण्यास शिकले पाहिजे.
शेजाऱ्या पाजाऱ्यांनी नाकं मुरडली/मित्रांनी निंदा केली, नातेवाईकांनी वागण्यातून धुळीचे लोट उडवले तरी आपण स्थिर व शांत राहण्यास शिकले पाहिजे भगवान बुध्द म्हणतात, यश-अपयश, लाभ-हानी, स्तुती- निदा काहीही झाले तरी ज्याचे चित्त प्रकंपित होत नाही, जो शोक करत नाही व आपल्या मनाला सतत सबल आणि निर्मल ठेवतो त्या व्यक्तीचे उत्तम मंगल होते. मनाच्या सवलतेसाठी व निर्बलतेसाठी मनाचा व्यायाम म्हणजे ध्यान करणे आवश्यक असते.
समाजात काहीजण आपले कौतुक करतात. काहीजण नाके मुरडतात. त्यांच्या मनासारखे आपण वागणे बंद केले की, निंदामहात्म्य पठणाला जोर येतो. तोंडावर गोड बोलणे व मागे निदा करणे हा सुमार व्यक्तींचा मनोधर्म असतो. अशा व्यक्तींकडे शहाणी माणसे दुर्लक्ष करतात. त्यांचा विचार करत आपण बसलो की, आपल्या मनःशक्तीचा अपव्यय होतो.
जग काय म्हणेल यापेक्षा आपली बुद्धी व प्रज्ञा काय म्हणते हे महत्वाचे असते. आपण इतरांच्या निदेकडे दुर्लक्ष करावे आणि आपणही कोणाची निंदा करू नये.
समर्थ रामदास म्हणतात “जनी निंदय ते सर्व सोडोनी दयावे। जनी वंद्य ते सर्वभावे करावे ।। समाजात वावरताना निदय आचरण टाळावे व बंदय आचरण मनापासून करावे, “कुणी निंदा कुणी बंदा । आमचा स्वहिताचा धंदा ।” हा तुकोबारायांचा अभंग नित्य आचरणात आणणे गरजेचे आहे. शेवटी ज्या झाडाला फळे असतात, त्यालाच लोक दगडी मारतात, त्यामुळे जननिंदेकडे दुर्लक्ष करून आपले वागणे सरळ, निर्मळ व कोमल ठेवा. विरोधकांचा वारा सहन करता करता निदेच्या पावसात भलेपणाची छत्री उघडून धरा व आनंदी रहा.
शेवटी म्हणतात ना, “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। छोडो बेकार कि बाते तुम, कही बीत न जाये रैना ॥”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
