एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मालकीच्या खासगी तलावामध्ये भरपूर मासे होते. एक कोळी सहज हाती काही लागावे म्हणून त्याच्या त्या आवारात चोरी करण्याच्या उद्देशाने हळूच घुसला. मालकाच्या हे लक्षात आले की आपल्या आवारात कुणीतरी घुसले आहे. म्हणून त्याने पहारेकऱ्यांना त्याला पकडायला पाठवले, कोळ्याच्याही हे लक्षात आले की ते पहारेकरी हातात विजेरी घेऊन त्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला शोधत आहेत. त्याने क्षणात विचार करून अंगातला सदरा काढून टाकला, स्वतःच्या अंगाला राख फासली, डोळे बंद करून घेतले आणि जवळच्याच एका झाडाखाली बसून आपण ध्यानात मग्न झालो आहोत, असे ढोंग सुरू केले.
त्या पहारेकऱ्यांना घुसखोर कोण आहे, हे काही सापडलेच नाही त्यांना फक्त एवढे कळले की, कुणीतरी सत्पुरुष झाडाखाली ध्यानामध्ये मान आहेत. मालकाला जेव्हा हे कळले तेव्हा तो या विचाराने फार आनंदी झाला की कुणी सत्पुरुष त्याच्या आवारात मुक्कामाला आलेत, मग तो त्यांच्या दर्शनाला गेला व त्यांना फुले, फळे आणि दक्षिणा देऊन वाकून वंदन केले. दुसऱ्या दिवशी सगळीकडे बातमी पसरली की कुणा सत्पुरुषाने या श्रीमंत व्यापाऱ्याच्या आवारात आगमन केले आहे. लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी फुले, फळं आणि दक्षिणा घेऊन तिथं त्याच्या दर्शनाला येऊ लागले.
मित्रांनो, मग त्या कोळ्याच्या मनात आले मी खोटा साधू म्हणून इथे बसलोय तरी लोकं माझ्या पाया पडतात. माझ्यासमोर हात जोडतात. मला मान देतात. जर खरोखर मी साधू झालो तर मला हे सर्व भरपूर प्रमाणात मिळेल. मग त्या कोळ्याने खरोखर नैतिक मूल्यांना प्राधान्य देऊन खऱ्या अर्थाने पवित्र व निर्मल जीवन जगायचं ठरवलं. परिणामी त्याने स्वतःच्या जीवनाचा उत्कर्ष केला.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
