मानसशास्राचा एक प्राध्यापक त्याच्या विद्यार्थ्यांना चिंतेवर विजय कसा मिळवायचा, हे शिकवत होता. त्याने एका विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असलेल्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी ओतलं व ते लोकांना दाखवायला सांगितले. सर्वांना वाटलं आता तो विचारेल की “अर्धा ग्लास भरला आहे की, अर्घा ग्लास रिकामा.” पण हसतहसत त्या प्राध्यापकाने त्या माणसाला विचारलं, “याचे वजन किती आहे?” ते वजन फार तर ४०-५० ग्रॅम होते. तो प्राध्यापक म्हणाला, हाच ग्लास आता तुम्हाला १५ मिनिटे धरून ठेवायला सांगितला तर काय होईल? ‘माझा हात दुखेल, कळ येईल’ असे उत्तर त्या माणसाने दिले.
प्राध्यपकांना हेच उत्तर अपेक्षित होते, उत्तर ऐकताच प्राध्यापक त्या माणसाला म्हणाले, “ग्लासमधल्या पाण्याचे वजन किती आहे. याने आता फरक पडत नाही, तर पाण्यासह तो ग्लास किती वेळ धरून ठेवला आहे याला महत्त्व आहे.”
जेवढा जास्त वेळ तुम्ही हा ग्लास हातात धरून ठेवाल तेवढा तो ग्लास हाताला त्रास देतो.
चिंता ही मानवी जीवनातील असाच भाग आहे. चिंता वेगवेगळ्या प्रकारे आपल्या डोक्यात घर करून राहातात. आई असाल तर मुलांच्या निकोप वाढीची चिंता, बायको असाल तर नवऱ्याविषयीच्या चिंता, नोकरी करणारे असाल तर उत्तम परफॉर्मन्स देण्याची चिंता, व्यवसाय असेल तर तो वृद्धिंगत करण्याची चिंता असतात. इतकेच काय तर शाळा महाविद्यालयातल्या मुलांनाही मार्काची चिंता असते. तरुण असाल तर रोजगाराची चिंता असते.
चिंता घालवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणेही आपल्याच हातात असते. चिंता व दुःख जेवढे जास्त वेळ तुमच्या डोक्यात धरून ठेवाल तेवढे जीवन अधिक दुःखद होईल म्हणून चिंता जास्त पकडून न बसता त्यांना सहजपणे सोडून द्या व आनंदी रहा. चिंता सोडून देण्यासाठी ध्यानाची जोड द्या.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
