इसाप अथेन्समधील एका रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली निवांत बसलेला होता.
तेव्हा एक वाटसरू त्याच्यासमोर थांबला व त्याने इसापला विचारले, “अहो महाशय, मला या गावात राहायला येण्याची इच्छा आहे. मला सांगा या गावातील माणसे कशी आहेत?”
इसाप त्याला म्हणाला, “तू जिथून येथे रहायला येणार आहेस त्या ठिकाणची माणसे कशी होती?” हा प्रश्न ऐकताच तो वाटसरू म्हणाला, काय सांगू साहेब, मी जिथे आत्ता राहत आहे तिथली माणसे अत्यंत बेकार, भांडकुदळ, खोटारडी व वाईट आहेत. हे उत्तर ऐकताच इसाप त्या वाटसरूला म्हणाला, “मित्रा, तू इकडे राहायला येऊ नकोस कारण इथेपण त्याच प्रकारची माणसे आहेत, तुला इथेपण तसाच त्रास होईल.”
त्याचवेळेस अजून एक पांथस्थ इसापजवळ थांबला व इसापला म्हणाला “साहेब, मला या भागात भाड्याने घर मिळेल का? व या भागातली लोक स्वभावाने कशी आहेत?” हा प्रश्न ऐकताच तो पांथस्थ म्हणाला, “साहेब, मी आत्ता म्यासमा भागात राहत आहे पण माझ्या नोकरीचे ठिकाण बदलल्याने व ते येथून जवळ असल्याने मी येथे राहण्याचा विचार केला आहे. मी जेथे आत्ता राहात आहे तेथील लोक खूप सज्जन, परोपकारी, प्रेमळ व गुणी आहेत.”
ती एकमेकांना खूप मदत करतात त्यांना सोडून येताना मला फार वाईट वाटत आहे. पण नाइलाज आहे. म्हणून मी इथे रहायला यायचे ठरवले आहे. हे ऐकताच इसाप म्हणाला, “मित्रा, नक्कीच इथे तुला खोली भाड्याने मिळेल व तू लवकर इथे रहायला ये इथली माणसेपण खूप प्रेमळ, दयाळू, परोपकारी आहेत. मित्रांनो हे जग आपल्या विचारांचा आरसा असतो. जगाला तुम्ही कोणत्या नजरेतून, कशा पद्धतीने पाहता त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत ज्या रंगाचा तुम्ही चष्मा घालाल, जग
तुम्हाला तसेच दिसेल”.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
