रस्त्याच्या कडेला बसून एक पोरगा काही तरी लिहीत होता.
सहामाहीचा पेपर सुटला होता त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पोरासोरांची गर्दीच गर्दी होती.
पण हा पट्ट्या पोलवर चिटकवलेल्या जाहिरातीचा मजकूर लिहून घेण्यात गुंग होता.
मी हळूच त्याच्या मागं जाऊन उभा राहिलो तरी त्याच्या लिहिणं सुरूच होत.
हळूच बाजूला उभारून त्याला विचारलं, “काय लिहितोस रे?”
ते पोरगं चपापलं.
नुसतंच मान वर करून बघायला लागलं.
त्याच्या पॅडवर प्रश्नपत्रिका होती अन् त्यावर लिहिलेलं बघत म्हटलं, “अक्षरं भारीच आहे की रे, कितवीला आहे?”
“सातवीला” इतकं म्हणून पुन्हा मान खाली घातली.
मी विचारलं, “हे का लिहून घेतोस?”
माझ्याकडे न पहाताच तो म्हणाला,”आईला नोकरीची गरज आहे.”
पोलवर ‘पर्मनंट नोकरीची हमी’ अशा आशयाची जाहिरात होती.
यानंतर थोडावेळ त्यांच्याशी बोलत राहिलो.
कुठला आहेस? घरात कोण कोण आहे?
शाळेत कुठल्या आहेस?
मला या संवादातून एक लक्षात आलं की, त्याला आपल्या घराच्या परिस्थितीची ‘जाणीव’ आहे.
आणि दुर्दैवाने नेमकं हेच आजच्या विद्यार्थ्यांकडे क्वचितच पाहायला मिळते.
त्याला कुठलेही उपदेशाचे डोस न पाजता पुढे निघालो.
वाटेत शेकडो विद्यार्थी पेपर संपवून रस्त्यावर घोळका करून उभे असलेल्या राहिलेल्या पोरांकडे बघितलं.
ज्यांच्या धिंगाण्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना, लोकांना, विशेषतः मुलींना त्रास होतोय याच भान नसलेल्या पोरांना बघितलं.
एका ठिकाणी तर ऐन शाळेच्या समोर उभ्या असलेल्या स्कूल बसच्या खाली फटाके फेकून असूरी आनंद लुटणारी पोरं दिसली.
काही टोळकी आसपासच्या पान टपऱ्या भवताली उभा राहून काही तरी चघळत होती. मोठमोठ्यांनी एकमेकांच्या आई बहीणींचा उध्दार करत होती. अचकट-विचटक बोलत होती.
अन् दुसऱ्या बाजूला हा सातवीतला पोरगा जो आईला काम मिळावं म्हणून भवतालच भान विसरून जाहिरात लिहून घेत होता.
‘जाणिवा’ विकसित झाल्याशिवाय शिक्षण ही नाही अन् प्रगती ही नाही.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – रवि निंबाळकर
