आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत का?
एकदा एक राजा एका साधूला पाहून खूपच प्रभावित झाला होता. रोज रात्री राजा आपल्या घोड्यावर स्वार होऊन संपूर्ण राज्यात फेरफटका मारण्यासाठी निघत असे. त्यावेळी राजा त्या साधूला रोज बघत असे. तो साधू एका झाडाखाली बसून आपल्याच विश्वात मग्न झालेला असे. कधी बासरी वाजवत तर कधी नाचत, कधी गाणं गुणगुणत तर कधी शांत बसून आकाशातील तारे न्याहाळत असे.
जेव्हा जेव्हा राजा घोड्यावर स्वार होऊन त्या साधू जवळून जात असे तेव्हा राजा तिथेच थांबून त्या साधूचे ते निश्चिंत जगणं बघत असे आणि नंतर गुपचूप तिथून निघून जात असे. हळूहळू त्या साधूला असे बघण्यात राजा इतका मग्न होऊ लागला की किती वेळ गेला हे त्याला कळतच नसे. राजा रोज एका झाडाच्या मागे गुपचूप उभा राहून त्या साधूचं ते मजेत जगणं बघत असे. त्याच्या त्या आनंदी जगण्यामध्ये स्वतः इतका रंगून जात असे की त्याच आनंदी
मनस्थितीत राजा घरी परत येत असे. हे त्याचं रोजचंच काम झालं होतं.
एके दिवशी, राजा इतका भावनाविवश झाला की तो त्या साधूच्या पाया पडला आणि त्याला म्हणाला, साधू महाराज मी तुम्हाला येथे राहू देणार नाही. पावसाळा जवळ येत आहे. या झाडाखाली तुम्ही पावसाळ्यात कसे राहू शकाल? तुम्ही माझ्या महालात येऊन राहण्याची कृपा करा आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या.”
हे ऐकताक्षणी साधू उठून उभा राहिला आणि आपली झोळी घेऊन म्हणाला, “चला जाऊया.” हे बघून राजाला आश्चर्याचा धक्काच बसला. राजाला वाटलं होतं की आपलं म्हणणं ऐकल्यानंतर साधू म्हणेल – कसला महाल, कोणता महाल, मी जिथे आहे तिथेच आनंदी आहे. मी महाल आणि तत्सम सर्व सुखांचा, सुविधांचा त्याग केलेला आहे. राजाला साधूकडून हे सर्व ऐकण्याची अपेक्षा होती… साधू जर हे सर्व बोलला असता तर मग राजा साधूच्या पायावर डोकं ठेवून अजून थोडी विनंती करणार होता… पण साधू तर लगेच उठला आणि राजाबरोबर जायला तयार झाला त्यामुळे तो थोडा आश्चर्यचकित झाला.
राजाच्या मनात आले मी काही चूक तर नाही ना केली… ह्या व्यक्तीने माझ्याबरोबर काही चतुराई तर केली नाही ना… ही त्याची महालात घुसण्यासाठी केलेली युक्ती तर नाही ना? कदाचित हा सापळा तर नाही ना… मी उगीचच या फंदात पडलो. राजाच्या मनामध्ये हे सगळे विचार चालूच होते तोपर्यंत तो साधू राजाच्या घोड्यावर बसलादेखील आणि राजाला निघण्यासाठी बोलवू लागला. आयुष्यात पहिल्यांदाच राजाला महालापर्यंत पायी जावं लागणार होतं कारण साधू मजेत घोड्यावर बसून जात होता. राजाच्या मनात शंका-कुशंकांचे पेव फुटू लागले. परंतु आता साधूला म्हटल्याप्रमाणे त्या गोष्टीपासून राजा मागेही हटू शकत नव्हता. परंतु राजाच्या मनामधून साधू बद्दलचा आदर संपला होता.
साधू झाडाखाली राहत असे तसाच तो महालातही राहत होता. तो साधू झाडाखाली जसा बासरी वाजवत असे तसा महालात देखील धुंदीत बासरी वाजवत होता. परंतु तो आता महालामध्ये मखमली गादीवर बसून बासरी वाजवत होता. हे सर्व बघून राजाच्या मनात चलबिचल सुरू झाली. तो विचार करू लागला की मी कोणाला महालात घेऊन आलो. हा कोणी साधू वाटत नाही. राजापेक्षा जास्त आरामदायी आयुष्य तो जगत होता. राजाला मात्र आपलं राज्य, आपला महाल, आपली धन दौलत आणि प्रजेच्या सुखासाठी खूप काळजी करावी लागत होती. परंतु साधूला तर कसलीच चिंता नव्हती. तो तर आपल्याच धुंदीत बासरी वाजवत नाचत होता, गाणं म्हणत होता, आपल्याच धुंदीत जेवत होता.
सहा महिने राजा गप्प होता, परंतु आता हे सर्व राजाच्या सहनशक्तीच्या पलिकडे गेलं होतं. एक दिवस राजा साधूला म्हणाला, “हे साधू महाराज, माझ्या मनात एक जिज्ञासा आहे. मला जाणून घ्यायच आहे की आता माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे?” साधू म्हणाला, “फरक जाणून घ्यायचा आहे?” राजा म्हणाला, “होय महाराज.”
साधू म्हणाला, “तुम्ही सहा महिने स्वतःला का त्रास करुन घेतला? जेव्हा मी घोड्यावर चढून बसलो त्याच वेळी तुम्ही ही गोष्ट विचारू शकला असतात कारण मी पाहिले की तत्क्षणी ही गोष्ट तुमच्या मनात आली होती. मी तुमच्या चेहर्यावर स्पष्ट पाहिलं होत. जेव्हा माझी झोळी घेऊन मी तुमच्या बरोबर निघायला तयार झालो, तेव्हा पासून हा प्रश्न तुमच्या मनात होता. सहा महिने आपल्या मनाला वेड्यासारखा का त्रास देत राहिलात? तिथेच मला विचारलं असतं तर मी झोळी परत खाली ठेवून तिथेच बसलो असतो. तुम्ही का नाही मला विचारल, का बरं गप्प बसलात? मी वाटच बघत होतो की तू मला केव्हा हा प्रश्न विचारशील. ठीक आहे, उद्या सकाळी मी तुला हा फरक सांगेन. परंतु हो, ते मी तुला गावाच्या बाहेर सांगेन.”
हा फरक जाणून घेण्यासाठी राजा खूपच उत्सुक होता. तो विचार करत होता मी जे अन्न खातो तेच आता तोही खातो. मी ज्या खोलीमध्ये राहतो त्यापेक्षा जास्त चांगल्या खोलीमध्ये तो साधू राहतो. माझं काम दोन ते तीन नोकर चाकर करतात परंतु साधू मात्र संपूर्ण दिवसभर पंधरा ते वीस नोकरांना राबवून घेतो. त्याच्या गरजांना तर काही अंतच नाही. तो शानदार कपडे देखील घालतो. त्यामुळे असं वाटत की तो स्वतः या महालाचा राजा आहे. बाकी लोक कमीत कमी मला घाबरतात तरी, पण या साधूच्या डोळ्यांमध्ये भीतीही दिसत नाही. परंतु तो मात्र न थांबता कसलीही चिंता न करता दिवसभर फक्त बासरी वाजवत असतो. आता बघूया, आज काय फरक सांगणार आहे तो. त्या रात्री राजा झोपू शकला नाही, म्हणून तो सकाळी लवकर तयार होऊन साधू जवळ पोहोचला.
तिथे त्याच्या खोलीत जाऊन बघितलं तर साधूने ते जुने कपडे घातले होते जे तो झाडाखाली घालून बसला होता. एका हातात त्याची झोळी होती आणि दुसऱ्या हातात बासरी होती. तो तयार होऊन उभा होता. राजा म्हणाला, “जाऊया महाराज.” मग दोघं महालाच्या बाहेर आले. चालता-चालता नदी पार झाली. काही वेळानंतर दोघेही गावाच्या बाहेर आले.
राजाने विचारले, “अजून किती वेळ चालायच आहे?” साधू म्हणाला, “बस, थोडा वेळ अजून.” सकाळी चालायला सुरुवात केली होती आता दुपार झाली. राजा म्हणाला, “मी आता याच्यापुढे तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते इथेच सांगा.” साधू म्हणाला, “मी पुढे जात आहे. तुम्ही येणार आहात का?” राजा म्हणाला, “मी कसा येऊ शकेन? माझा महाल, माझी बायको, माझी मुलं, माझी धन दौलत सगळं तर मागेच राहिलं आहे. मी तुझ्या सारखा फकीर नाही ज्याला कशाचीही चिंता नाही.”
साधू म्हणाला, “बस हाच तर फरक आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये. मी कुठेही जाऊ शकतो पण तुम्ही नाही. मी कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो पण तुम्ही नाही. जेव्हा मी त्या झाडाखाली राहत होतो तेव्हाही मी आनंदी होतो आणि आपल्या जीवनाचा एक एक क्षण आनंदाने जगत होतो. मी महालात असो वा इतर कुठेही असो, मी माझ्या आयुष्यातील एक एक क्षण निश्चिंत आणि आनंदाने जगत होतो. आणि आताही मी दुसरीकडे कुठेही गेलो तरी मी असाच जगेन. मी कुठेही रहात असलो तरी मी तसाच असतो. मी भूतकाळाबद्दल पश्चाताप करत नाही वा भविष्याची चिंता करत नाही. मी फक्त वर्तमान काळातच जगतो कारण मी समजून चुकलो आहे की वर्तमान क्षणात जगणे हेच आयुष्य आहे. तुमच्यात आणि माझ्यात हा एक छोटासा फरक आहे . तुम्ही परिस्थितीनुसार जगत असता तर मी परिस्थिती तयार करतो.
तुमचा आनंद किंवा दुःख हे तुमच्या आजूबाजूच्या घटनांवर अवलंबून असते. पण माझ्यासाठी मात्र या घटना आयुष्याचा एक भाग असतात.”
त्याच क्षणाला राजाला जाणवलं की अरे, मी हे काय केलं? इतक्या अद्भुत व्यक्तीला मी ओळखू शकलो नाही. सहा महिने या व्यक्तीबरोबर असूनही आपण यांना जाणून घेऊ शकलो नाही. कारण आपण हेच धरून चाललो होतो की हे ढोंगी बाबा आहेत.
राजाने साधूचे पाय धरले आणि म्हणाला, “नाही महाराज, आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही. साधू म्हणाला, “बघ मला काहीच त्रास होणार नाही. मी परत येईन परंतु ते तुलाच त्रासदायक होईल.” हे ऐकल्यानंतर राजाच्या मनात तेच विचार परत आले की अरे हा साधू तर लगेच राजवाड्यात यायला तयार झाला. साधूने राजाच्या चेहर्याकडे लक्षपूर्वक बघितलं आणि म्हणाला, “परंतु आता मी येणार नाही, कारण तू सुधारणार नाहीस. तुला परत त्रास होईल आणि तू परत काळजीत पडशील. मला काहीच फरक पडत नाही! मी साधू आहे. माझ्यासाठी महाल आणि जंगल सर्व सारखंच असतं. मला काहीही अडचण नाही कारण ज्याला अडचणी असतात तो संन्यासी असूच शकत नाही. माझी बासरी जशी महालामध्ये वाजत होती, तशीच ती जंगलांमध्ये ही वाजेल आणि ती तशीच वाजत राहील.” हे बोलून तो साधू तिथून निघून गेला आणि राजा तिथेच उभा राहून त्या साधूला निघून जाताना बघत राहिला.
बोध
मित्रांनो, या गोष्टीमध्ये एक मतितार्थ लपलेला आहे. आपल्याला वाटतं की आपण स्वच्छंदी आयुष्य जगत आहोत पण खरं तर आपण आपल्या अवचेतन मनाच्या अधिपत्याखाली आहोत. आपण आपल्या अवचेतन मनाचे गुलाम आहोत. त्या साधूची खरोखरच त्याच्या मनावर हुकुमत होती आणि आपल्याला मात्र आपल मन सांगेल तस वागाव लागत.
“आपण आपल्या मनावर ताबा मिळविला तर कोणत्याही बाहेरील गोष्टींचा किंवा वातावरणचा त्यावर काहीही परीणाम होऊ शकत नाही आणि आपल्या अंतरंगात अशांतता निर्माण होऊ शकत नाही.”
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
