केदारचे वय ३५ वर्षे झाले होते, लग्न जुळतच नव्हते कायमस्वरूपी नोकरी नसल्याने पैशाचीही चणचण भासे. त्यामुळे घरातही त्याला फारशी किंमत उरली नव्हती मित्राकडून घेतलेली उसनवारी वेळेवर परत न केल्यामुळे त्यांचे अपशब्द ऐकायला लागत होते. आपले नशिबच फुटके आपण दरिद्री कर्जबाजारी कर्तुत्वशून्य अशा विचारांमुळे केदारच्या डोक्यात चालता चालता नकारात्मक विचारांचे वादळ उठायचे व त्याला नैराश्य यायचे त्यातून तो नकारात्मक विचारांकडे ओढला जायचा, त्यामुळे शारिरिक स्तरांवर देखील केदार वारंवार आजारी पडायचा. हळूहळू नकारात्मक विचारांमध्ये सापडल्यामुळे शेवटी केदारला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली.
मित्रांनो जसा तुम्ही विचार कराल त्या प्रकारच्या तरंगाशी तुम्ही समरस होऊ लागता. भगवान बुद्ध म्हणतात, “सब्बो लोको प्रकंपीतो” (सर्व विश्व हे तरंग आहे, प्रकंपन आहे.) रेडिओच्या सुईला फिरवताना जे स्टेशन तुम्हाला ऐकायचे असेल त्या स्टेशनवर सुई आणतात व प्रक्षेपण चालू होते. निसर्गात विविध प्रकारच्या तरंगाचे वहन चालू असते. तुमचा विचार हा पण एक तरंगच असतो. त्यामुळे नकारात्मक विचाराला थारा न देता त्याला सकारात्मक करा. नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे यालाच तुकाराम महाराज “रात्रंदिन आम्हा, युद्धाचा प्रसंग” (मनाचे मनाशीच युद्ध) असे संबोधतात. मनात २४ तासात ६०,००० विचार येतात त्यातील ६०% विचार हे नकारात्मक असतात त्याला सकारात्मक करण्याची कला अवगत नसेल तर केदारसारखी अनेक माणसे नैराश्यात (ताणतणावात) जातात म्हणून नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे आणि सर्व विचार वर्तमानकाळात करून अंर्तमनाला सूचना दिल्याने त्या प्रकारच्या विचारांच्या कर्मफळाला गती येते. पूर्वी लोक म्हणायचे, तुम्ही जो विचार कराल त्याला वास्तुपुरूष तथास्तु म्हणतो. आपल्या विचारांना प्रतिसाद देऊन त्या प्रकारच्या कर्मफळाला आपण आपल्या आयुष्यात ओढत असतो म्हणून वर्तमानकाळात सकारात्मक विचार करण्याची कला अवगत करणे ही एक साधनाच आहे या साधनेचा जास्तीत जास्त सराव करा. लोकसंख्येच्या १% माणसं ही ठार वेडी असतात आणि ३३% माणसं सीमारेषेवर असतात. जगातल्या १०% लोकांना झोपच येत नाही मधुमेह उच्चरक्तदाबाचे रूग्ण भारतात सर्वाधिक आहेत.
आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मन प्रमुख आहे. या मनावर येणारा ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी माणसे जोडा, एकलकोंडेपणा सोडा, वेळेचे व्यवस्थापन करा, व्यायाम करा, तोंडात लाळ तयार करून ती गिळा (लाळेत अँड्रानील असते, त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते), म्युझिक विशेषतः शास्त्रीय संगीत ऐका, योगा व प्राणायाम करा आपल्या रोजच्या जगण्यात मनात येणारे विचार एका फुलस्केप पेपरवर कसलाही विचार न करता भराभर लिहा व ते परत न वाचता फुलस्केप पेपर फाडून टाका. (यामुळे दबलेल्या भावनांना रिलीफ मिळतो), आठवड्यातून एकदा पायाचा घोटा बुडेल एवढ्या गरम पाण्यात मुठभर मीठ टाकून त्यात दहा मिनिटे पाय ठेवून बसा, आवडता छंद जोपासा, लहान मुलांबरोबर खेळा, प्राण्यांशी खेळा, लोक काय म्हणतील यावर जास्त विचार करू नका, भावनांचे दमन करू नका, शरीराला मसाज व स्टीम द्या, टाळ्या वाजवा, जोरजोरात हसा, सकारात्मक विचार करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोज सकाळ-संध्याकाळ दहा मिनिटे शांतपणे मांडी घालून बसा व येणाऱ्या व जाणाऱ्या श्वासाचे तटस्थपणे निरीक्षण करा. शुद्ध श्वासाला आकडा- आकृती-मंत्र याची जोड अजिबात देऊ नका. शुद्ध व स्वाभाविक श्वासाचे तटस्थपणे निरीक्षण हा तणावातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग आहे.
समजा नैराश्याचे प्रमाण जास्तच वाटले-आत्महत्येपर्यंतचे विचार मनात घोळू लागले. तर मात्र मेंदूमध्ये काही रासायनिक घटकांची कमतरता निर्माण झाल्याने जिवरासायनिक असंतुलन होते आहे, हे लक्षात येऊन ते घटक वाढवण्यासाठी त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे म्हणजे आपण वेडे आहोत असे मुळीच नाही. अमेरिकेत ६०% लोक कधी ना कधीतरी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतात. अवास्तव अपेक्षा न बाळगता आनंदी रहावयास शिका. आनंदी जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी दहा दिवसाचे विपश्यना शिबिर करा, विपश्यना केल्यानंतर इतर उपायांची गरजच भासणार नाही. स्वच्छंदपणे विहार करा.
“कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंख आहेत,
डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरांसारखे पंख आहेत”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
