आज वाटते पुन्हा एकदा बालपण यावे
पांदीमधल्या वाटेवरूनी शाळेकडे जावे ।।१।।
पाेतडी पिशवी बाई कन्हायची सदा पाठी
चढण चढता कसरत हाेई आेढ्याकाठी ।।२।।
जांभुळीची जांभुळे खिशात भरूनिया घ्यावी
कधी ताेडुनी कारे,बाेरे गुरूजीसाठी न्यावी ।।३।।
भुईमुंग,मुग आेल्या शेंगा वारवा माईचा
शिकवा माझ्या पाेराला संदेश तिचा घाईचा ।।४।।
घंटा घण घण पहिली स्वच्छतेला लागावे
व्हरांड्याचे सारवण पाेरींनी शेण मागावे ।।५।।
प्रार्थनेला उभी पाखरे शारदेला गायची
माेठं हाेण्याचं स्वप्नं याच अंगणी पाहायची ।।६।।
पाटी पुसता थुंकीने पाठीत बदका पडे
निरगुडीचा फाेक द्यायचा शिस्तीचेच धडे ।।७।।
सुट्टी हाेता दुपारची खायची ठेचा भाकरी
मनी सलायची भाबड्या आईबाची चाकरी ।।८।।
पुस्तकातील फाटक्या कवितेचे व्हावे गाणे
शेलवटांनी चिकटवली निखळती पाने ।।९।।
चुळचुळ मुंगळा,सुरफाट्या खेळ खेळावे
धुम ठाेकित रस्त्यावरूनी शर्यती पळावे ।।१०।।
शाळा सुटली पाटी फुटली धाव घराकडे
पावसाळी ऋतूत वाहे आेढा भरूनी गडे ।।११।।
पुऱ्या आठवती चिखलवाटा,रूतला काटा
आनंददायी क्षणाक्षणांचा उरी केला साठा ।।१२।।
म्हणुनी म्हणताे पुन्हा तेच बालपण यावे
पांदीमधल्या वाटेवरूनी शाळेकडे जावे ।।१३।।
– अज्ञात लेखक
