पुस्तकांविषयी प्रेम निर्माण करा

तुम्ही जास्तीतजास्त पुस्तकं वाचावीत यासाठी मी तुम्हाला प्रवृत्त करीत राहणार आहे. त्यासाठी मला माफ करा. मला असं वाटतंय की तुमचं मन, तुमचं हृदय, तुमचं घर पुस्तकांनी भरून जावं. आपल्याभोवती ज्ञानाचा वेढा असणं-भोवताली कागदी गड्ढे असणं (होय, मला छापील पुस्तकं सगळ्यांत जास्त आवडतात) -ही आयुष्यातली सगळ्यांत चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी तरी आहे. माझी खात्री आहे की तुमच्यासाठीसुद्धा आहे.

 

रोज किमान एक तास वाचन का करावं (इथून पुढे तुमच्या उरलेल्या आयुष्यात) याची काही कारणं इथे थोडक्यात सांगितलेली आहेतः

 

कारण # १: वाचन ऑनलाईन प्रोग्रॅम्स तुमच्या ताटात आयती माहिती वाढत असण्याच्या आणि माध्यमं तुमचं मत बनवून देण्याच्या या युगात तुम्हाला स्वतःविषयी विचार करायला लावण्याचा मोठा क्रांतिकारी बदल वाचन तुमच्यात घडवतं. वेगवेगळ्या लेखकांचं वेगवेगळी मतं असलेल्या लिखाण वाचून फस्त केल्यानं तुम्ही तुम्हाला महत्त्वाच्या असलेल्या विषयांबद्दल स्वतःचं मत बनवू शकता. मेंढरासारखं गर्दीच्या मागे धावणं टाळू शकता.

 

कारण # २ः या ऱ्हास होत चाललेल्या संस्कृतीचा सखोल अभ्यास आपण वाचनामुळे करू शकतो. आपल्या माहितीत भर घालणाऱ्या डिजिटल साधनांपेक्षा आणि दहा सेकंदांच्या व्हीडिओपेक्षा पुस्तकांमध्ये (विशेषतः गहन विषयांवरची) गढून गेल्यानं तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भता येते. आणि परिणामतः तुम्ही मनानं खंबीर असणाऱ्या आणि मोठमोठ्या समस्यांनाही यशस्वीपणे तोंड देणाऱ्या त्या दुर्मीळ लोकांच्या पंगतीत जाऊन बसता.

 

कारण # ३: वाचनामुळे तुमचं चित्त एकाग्र राहण्याचा कालावधी वाढतो. बऱ्याच जणांना त्यांचं लक्ष पूर्णपणे केंद्रित करता येत नाही. या त्यांच्या कमकुवतपणामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं. सगळे असामान्य लोक त्यांची एकाग्रता सर्वोच्च पातळीपर्यंत वाढवत नेतात-त्यामुळे ते सातत्याने एका मानसिक स्थितीत अनेक तास राहू शकतात आणि तेव्हाच त्यांना त्या अफलातून कल्पना सुचतात आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या क्षेत्रात श्रेष्ठत्व प्राप्त होतं.

 

कारण # ४: वाचनामुळे तुमच्या ज्ञानात भर पडत राहते. त्यामुळे तुम्ही जगात जास्त आत्मविश्वासानं वावरता. जगातल्या गोष्टींची चांगली जाण आल्यामुळे तुमच्या हातून घडणाऱ्या चुकांचं प्रमाण कमी होतं कारण जगातील महान व्यक्तींबद्दल वाचून मिळालेल्या ज्ञानाचा तुम्ही फायदा करून घेता. याचा अर्थ तुमचा वेळ वाचतो. तुम्हाला होणारा त्रासही कमी होतो आणि एकुणात तुमची धावपळही कमी होते.

 

कारण # ५: वाचनातून तुम्हाला प्रेरणा मिळते. तुम्ही स्वतःच जर प्रेरित नसाल.

 

तर जे तुम्हाला आपला नेता मानतात, ज्यांना तुमच्याकडून काही शिकायला मिळतं, जे तुमच्या क्षेत्रात काम करतात त्यांना तुम्ही प्रेरित करू शकत नाही. आशादायी राहण्याचा, उत्साही राहण्याचा आणि इतरांनाही देऊ शकू अशी भरपूर सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा सगळ्यांत चांगला मार्ग म्हणजे महान लोकांनी आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून केलेल्या कामगिरीबद्दल वाचणं. ज्यांनी उंचच उंच शिखरं पादाक्रांत केली आहेत त्या धाडसी लोकांची चरित्रं वाचा. ज्यांनी रखरखीत वाळवंटातून प्रवास करण्याचं धाडस केलं आहे त्यांचं चरित्र वाचा. प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या संशोधकांचं आत्मचरित्र वाचा. मानवजातीच्या मर्यादा पार करून यशस्वी झालेल्या उद्योजकांचं आत्मचरित्र वाचा. इतिहासात ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे, ज्यांनी जागतिक पातळीवर चळवळी उभ्या केल्या, ज्यांनी जगाला मानवतेची शिकवण दिलीय अशा थोर स्त्री-पुरुषांची ओळख करून घ्या. त्यासाठी त्यांच्या आयुष्याबद्दल वाचा. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची सफर करा.

 

मनोरंजनाचे व्हीडिओज बघत बसण्याऐवजी (ते बघितल्यावर तुमची बौद्धिक आणि आध्यात्मिक पातळी खालावते) हातात आलेलं प्रत्येक पुस्तक तुम्ही वाचावं यासाठी अजून बरीच कारणं मी इथे देऊ शकलो असतो.

 

तुम्ही मोठं व्हावं असं मला मनापासून वाटतं म्हणून मी परत एकदा सांगतोः वाचत रहा! वाचत रहा! वाचत रहा!

 

वाचाल तरच वाचाल!!!👍

 

                                                                                                     आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!