पंढरपुरात एक भिक्षुक होता.रोज घरोघरी भिक्षामागुन जीवन जगायचा.त्याला स्वत:चे घर नसल्यामुळे आणि जवळचं कुणी नसल्यामुळे तो एकटाच धर्मशाळेत रहायचा.कुणी त्याला अन्न द्यायचं,कुणी कपडे तर कुणी पैसे द्यायचं.रोजचं गरजेपुरतं अन्न भेटलं की भिक्षा मागणं बंद करायचा,जरूरी नसलेले कपडे इतर गरजू लोकांना दान द्यायचा.पैसे मात्र स्वतःकडेच ठेवू लागला.त्याला स्वत:चा असा काहीच खर्च नव्हता त्यामुळे दिलेले पैसे तसेच राहु लागले.हळूहळू त्यात तो आसक्त झाला आणि रोज किती पैसे झाले हे मोजण्यात राहिलेला दिवस घालवू लागला.
भरपूर पैसे जमा झाल्यावर त्याने विचार केला काशीला जाऊ. गंगेत स्नान करू,विश्वनाथाचं दर्शन घेऊ. पैसे जमा होते तरी आता वाटेतही तो भिक्षा मागूनच जेवत होता आणि पैसे जमवत होता कारण आता तो त्या द्रव्याच्या मोहात होता.स्वत:च्या जेवणासाठीही पैसे खर्चायला त्याचं मन तयार होत नव्हतं इतका तो त्यात गुंतत चालला होता.
शेवटी एकदाचा तो गंगेकिनारी पोहोचला.वाटेत कितीतरी गरजू लोकं भेटले कुणी आजारी,कुणी भुकेले .पण याने पैसे असुनही कुणाला मदत केली नाही,फक्त ते जीवापाड सांभाळले पूर्ण प्रवासात!
आता स्नान करायला गंगेत उतरायचं तर पैशाची पिशवी कुठे ठेवायची हा प्रश्न आला .सोबत न्यायची तर पैसे भिजतील ,तिथेच ठेवली तर चोरीचं भय आणि कुणाकडे द्यायची तर अविश्वास ,फसवणुक होण्याची भिती! असा विचार करता करता बराच वेळ गेला. स्नान करून पुण्य तर मिळवायचं होतंच पण पैशाची आसक्ति त्याला रोखत होती .गंगा समोर ,विश्वनाथ शेजारी पण मन मात्र पिशवीत!!
शेवटी कसंतरी मन पक्क करून वाळूत खड्डा खोदला. त्यात पिशवी ठेवली .पण नदीतून बाहेर आल्यावर जागा कशी ओळखायची हा विचार आला.मग त्यावर एक शिवलिंग तयार केलं आणि स्नान करायला गेला मन पिशवीत ठऊनच! इकडे अजून भाविक आले,त्यांना वाटलं स्नानापूर्वी शिवलिंग करण्याची प्रथाचआहे आणि पहातापहाता तिथे बरेच शिवलिंग तयार झाले.
भिक्षुक गंगेबाहेर आला आणि इतके शिवलिंग पाहुन व्यथित झाला आणि ज्याला सांभाळण्यात आणि जमवण्यात भरपूर शक्ती व्यर्थ झाली होती ते सर्व द्रव्य त्याने काही क्षणात गमावले.त्याच्या नादात तो गंगास्नानाचं पूण्यही विसरला आणि काशीविश्वनाथाच्या दर्शनाच्या आनंदालाही मुकला!
आपलंही थोडंफार असंच होत नाही का?आपण आनंद ,सुखाच्या शोधात निघतो.पैसे कमवण्यात ,जास्त जास्त वस्तू जमवण्यात,यश प्रसिद्धी वाढवण्यात आनंद मिळेल असं वाटतं आणि ते आपण करत जातो….जीवापाड मेहनत करतो,यश संपादन करतो ,जीवन चांगलं जगण्यासाठी जरूरीच ते! पण या प्रवासात आपण साधनांतच गुंतत जातो आणि साध्य समोर असलं तरी त्याचा अनुभव घ्यायला विसरतो.अजाणतेपणात गरजू लोकांना मदत करायचं विसरतो आणि एखाद्या क्षणी आपल्यासोबत आपलं कमावलेलं सर्व वाळूखाली दबून नष्ट होतं.
इतरांसाठी केलेलं सत्कर्म आणि सत्कार्यच पिढ्यान् पिढ्या लक्षात रहातं…आपण स्वत:साठी आणि नावासाठी जगत असतो ,म्हणून आपल्यानंतर आपण लगेच विस्मरणात जाणारच.मनातली विविध गोष्टींसाठी आसक्ति सोडली तर थोडाफार बदल घडू शकतो.
दान देणं,दान करणं मनाच्या तसेच संपत्तीच्या शुद्धीकरणाचा एक उपचार!पिढ्या न् पिढ्या चालत आलेला संस्कार.निस्पृह जीवन जगण्यासाठी लागणारं पहिलं पाउल.आसक्ति पासुन दूर होण्यासाठी करायची सुरवात…!!
आसक्त आणि गुरफटलेलं आपलं मनच आपल्याला अशांत आणि अस्वस्थ करतं.आसक्ति attachment फक्त संपत्तीची किंवा वस्तुंचीच नसते. म्हणजे काही सामान किंवा पैसे दान करून किंवा त्यातून मन काढून आपण तेवढ्यापुरतं detach किंवा विरक्त होऊ शकू.हेही एखाद्यावेळी शक्य होईल . पण आपल्याला deep attachment,तीव्र आसक्ति असते ती नावाची,प्रसिद्धीची,अपेक्षांची,कौतुकाची आणि सर्वात खोलवर असते ती मानापानाची!त्यातुन निर्माण होणाऱ्या रागलोभाची! हे आपल्याला स्वस्थ राहु देत नाही.
या आपल्याला आवडणाऱ्या आणि अडकवणाऱ्या भावनांचं थोडं थोडं जरी दान करता आलं पाहिजे.त्यात गुंतलेलं मन मोकळं करता आलं पाहिजे.
त्याची पहिली पायरी आहे अन्नदान…सर्वात सोपं आणि सर्वश्रेष्ठ दान….पण ते क्षणिक सुख देतं…देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही!!!भुक असे पर्यंतच !!!
विद्यादानही उत्तम दान…आपल्याला येत असणाऱ्या गोष्टी ,कला,माहिती ,विचार ईतरांना देणं…त्यांना जीवन जगण्यासाठी…सुधारण्यासाठी मदत होणं हे ही उत्तमच आणि दानाचं सुंदर वळण….हे सुद्धा बऱ्यापैकी जमु शकेल .
बोध
पण अपेक्षांचं दान…माझ्या मुलांनी माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे…अभ्यासात मला वाटते तशी उंची गाठलीच पाहिजे…माझं ऐकलंच पाहिजे…सगळ्यांनी मला मान दिलाच पाहिजे…मी केलेल्या कामांची दखल घेतलीच पाहिजे….अशा कितीतरी आशाअपेक्षांचं….मानापमानांचं ….लोभ प्रलोभनाचं दान करता येणं किती अवघड आहे?
पण अशक्य नक्कीच नाही…आपण प्रत्येकक्षणी आपापल्या ईच्छेने आणि गतीने हे करू शकतो….तरच साधनांऐवजी साध्यावर लक्ष केंद्रीत करू शकू…नाही तर काशी विश्वनाथाऐवजी वाळूवरील शिवलिंगातच गुरफटलेले राहू!!.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
