सागर माझा शालेय मित्र. उत्कृष्ट शरीरयष्टी, देखणा, आर्थिक सुबत्ता व प्रतिष्ठीत असलेला सागर सामाजिक कार्याच्या निमित्ताने अपंगशाळेत जायचा. तेथेच एका पायाने अपंग देखण्या मुलीच्या प्रेमात सागर पडला व तिच्याशी विवाह करून आज त्यांचा संसार सुखाने चालला आहे. सागरला नात्यातील अनेक सुंदर श्रीमंत मुली लग्नासाठी आल्या होत्या. पण सागरच्या प्रेमाची बाग त्या अपंग मुलीच्याच राज्यात फुलली होती.
खरोखर प्रेम हे एक चिरंजीवी विश्वव्यापी तत्व आहे. ते कधी, कुठे, कोणावर, कसे होईल हे सांगता येत नाही. त्यात आपुलकी, स्नेह, माया, वात्सल्य असते. प्रेमाची भूक ही माणसाला जन्मापासून मरेपर्यंत असते. किंबहूना सर्वात पहिली भुक ही प्रेमाचीच असते. मूल मातेच्या उदरातून बाहेर आल्यावर पहिला टाहो फोडते ते दुधासाठी नव्हे तर त्याला ‘मायेची ऊब’ हवी असते म्हणून अखेरच्या क्षणीही माणसाला आपली प्रिय व्यक्ती जवळ असावी असे वाटते. असं खर प्रेम हे पारिजातकाची प्रसन्नता प्रदान करते. ते कधी मावळत नाही, त्याला अंध आसक्तीची अवकळा येत नाही ते अपेक्षाविरहीत असते.
‘क्षण एक पुरे प्रेमाचा । वर्षाव पडो मरणांचा।’ असे एक कवि म्हणाले होते. प्रेमाची दुनिया ही वेगळीच असते. यात कुणी योग्य मार्गाला लागतो तर कोणी वेडा होतो. प्रेमाच्या दुनियेत वाटेल ते घडू शकते. शपथा घेतल्या जातात, कविता स्फुरतात, त्यागाला भरती येते, रणरणते ऊन चांदण्यासमान वाटू लागते. जीवाची बाजी लावली जाते. माणूस स्वतःला विसरून जातो. प्रत्येकाला आपण कोणाच्या तरी प्रेमात पडावे, कोणीतरी आपल्यावर प्रेम करावे असे वाटत असते आपले प्रेम हे कोणाला दिसू नये, कोणी त्यात वाटेकरी असू नये, असे पोरवयातील प्रेमिकांना वाटत असते. वडीलधाऱ्यांना अनुभवाअंती प्रेमाचा पंचनामा केल्याशिवाय गहवत नाही त्यामुळे दोन पिढयात तेढ निर्माण होते. आजकाल खंडाळा, लोणावळा, माथेरान अशा निसर्गरम्य ठिकाणी मुले मुली सिनेमातील गाणी गाडीत लावून अंगविक्षेप करत नाचताना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसून येतात. पण ही वासनांची जत्रा भवयात्रा असते हळूवार भावनेतून ती अंत्ययात्रा विकारातून उद्भवलेली असते. रजनीश ओशो म्हणतात “प्रेम परमात्मा के निकटतम है। एक व्यक्ती को भी तुमने ठीक से प्रेम किया है, तो तुमने थोडासा परमात्माका स्वाद लिया है समझो।”
कुसुमाग्रज म्हणायचे “प्रेम कुणीही करावं, प्रेम कशावरही करावं.” संत नामदेवांना वाटे विठ्ठलाने आपल्याशी बोलावे. ते म्हणत, “तु माय मी लेकरू, तू गाय मी वासरू.” जनाबाईंना विठ्ठलाचे लेकुरवाळेपण भावले. आई मुलांवर अपेक्षा विरहित प्रेम करते. वंगभंगाच्या चळवळीत मुलांनी देशावर प्रेम केले, विवेकानंद भावविवश होऊन रात्री अपरात्री मायभूमीच्या भारतदेशाच्या आठवणीने रडत असत. भीमसेन जोशीनी गाण्यावर प्रेम केले, महाराष्ट्रातल्या मावळयांनी शिवाजी महाराजांवर प्रेम केले. आज भरकटलेली तरूणाई एकतर्फी प्रेमातून स्वतःचे जीवन संपवताना किवा समोरच्याला उध्वस्त करताना दिसत आहेत. यासाठी पालकांनी व गुरूजनांनी त्यांना वेळ देऊन, त्यांना मायेची उब देवून त्यांच्या मनातील प्रेमाची पोकळी भरून काढण्यासाठी वात्सल्याने प्रयत्न केले पाहिजेत.
त्यांना नैतिक मूल्यांचे धडे दिले पाहिजेत. त्यांना भावभावनांचे व्यवस्थापन करावयास शिकवले पाहिजे. या प्रेमात शहाणी सुरती माणसंही कधी कधी वेडी होतात, कामातून जातात, म्हणतात ना ‘इश्क ने निकम्मा कर दिया गालिब – वर्ना हम भी आदमी थे, कुछ काम के’ म्हणून सर्व प्राणीमात्रांवर भरभरून प्रेम करा, त्यात त्यागाची व निरपेक्षतेची भावना असू द्या. असे केल्यास प्रेमाच्या गावातील आनंदयात्रा जीवनात बहार आणेल. असे केले तर “प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचे देणे।” याचा अनुभव येईल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
