बोलताना विचार करा

थॉमस अल्वा एडिसन हा महान शास्त्रज्ञ होता. मात्र त्यालाही लहानपणी कमी लेखले जाण्याचा अनुभव होता. एडिसन शाळेत जाई, एकदा त्याला शिक्षकाने शाळेतून परत पाठवले. शिवाय त्याच्याबरोबर एक चिठ्ठीही पाठवली आणि ती चिठ्ठी आईला द्यायला सांगितली.
थॉमस घरी आल्यानंतर आईला त्याने ती चिठ्ठी दिली. आईने ती वाचली व तिने थॉमसला कडकडून मिठी मारली. थॉमसने तिला विचारलं, मम्मी, काय लिहिलेय या चिठ्ठीत? “त्या वेळेला तिने सांगितलं, “थॉमस, या चिठ्ठीत लिहिलंय, तुमचा मुलगा थॉमस हा फार विद्वान व प्रगल्भ आहे. त्याची बौद्धिक पातळी खूप उंचीची आहे. त्यामुळे त्याची बौद्धिक भूक भागवण्याइतपत कुवत आमच्या शिक्षकांकडे नसल्याने त्याला तुम्ही घरीच शिकवा, शाळेत पाठवू नका.”
हे ऐकून थॉमसला खूप आनंद झाला. “बरं झालं, मम्मी, मी खूप हुशार असल्याने तूच मला शिकवत जा.’ थॉमसच्या आईने थॉमसला घरीच शिकवायला सुरुवात केली. ती थॉमसला म्हणायची, “थॉमस, तू खूप विद्वान आहेस, तुझी बौद्धिक क्षमता खूप चांगली आहे.” याच थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. याच थॉमस अल्वा एडिसनच्या नावावर १०९३ पेटंटस् आहेत एक दिवशी थॉमस कपाट आवरत असताना त्याला एक जुना कागद सापडतो. तो कागद न्याहाळून पाहताना त्याच्या लक्षात येते की हा तोच कागद आहे जो काही वर्षांपूर्वी त्याच्या शिक्षकाने आईला दे सांगून थॉमसला घरी पाठवले होते. तो कागद थॉमस वाचतो. त्यावर शिक्षकाने लिहिले होते, ‘तुमचा मुलगा थॉमस हा मंदबुद्धीचा असल्याने इतर मुलांबरोबर आम्हाला त्याला शिकवणे खूप अवघड जात आहे. तरी तुम्ही त्याला शाळेत न पाठवता घरीच शिकवा अशी तुम्हाला आमची विनंती आहे. त्याच्यामुळे इतर विद्यार्थ्यांचा खूप वेळ जातो’.
ती चिठ्ठी वाचत असताना थॉमसच्या डोळ्यात अश्रु तरळले. आईनं थॉमसच्या मनाला उभारी देण्यासाठी चिठ्ठीतील मजकूर बदलून वाचला होता. त्यानंतरचा इतिहास सर्वच जाणतात. एडिसन हा संशोधक म्हणून जगन्मान्यता पावला. आपल्याही घरात असे एडिसन जन्माला येऊ शकतात आपल्या मुलांच्या मनाची उभारी वाढवण्यासाठी त्यांच्याशी सकारात्मक बोला. त्यांचे भरभरून कौतुक करा. कौतुकाची भूक भागवली की मुलं भावनिकदृष्ट्या पुष्ट होतात.
मुलांना सतत ओरडणे, तू मूर्ख आहेस, वेडपट आहेस, तुला अक्कल नाही अशा प्रकारची वाक्ये मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करू शकतात. त्यांना मानसिक दुर्बल बनवतात.
आपल्या सगळ्यांची अचेतन मनं- सबकॉन्शस- माईंड एकमेकांशी कनेक्टेड असतात. त्यामुळे आपण एखाद्याविषयी करत असलेल्या विचाराचंदेखील तरंगाच्या माध्यमातून त्या व्यक्तींपर्यंत वहन होत असते. सगळं विश्व तरंग आहे. त्यामुळे शब्द व विचार हेही तरंग आहेत. त्यामुळे स्वतःविषयी व इतरांविषयी बोलताना व विचार करताना सकारात्मक विचार करा. व सकारात्मक बोला. भगवान बुद्ध म्हणतात, “जसा तुम्ही विचार कराल तसेच तुम्ही व्हाल.”
संत महंत म्हणतात, “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.” विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!