मी करेन म्हणून सांगितलेलं नक्की करा

एक खूपच छोटासा संदेश तुमच्यासाठीः तुम्ही जर तुमच्या संपर्कातल्या एखाद्याला-कोणालाही मी एखादी गोष्ट करेन म्हणून सांगितलं असेल तर ती नक्की करा! खूप साधी, सरळ गोष्ट. सहज अनुभवाला न येणारी. तुम्ही असं केलंत तर लोकांना तुमचा भरवसा वाटायला लागेल. त्यांचा तुमच्यावर विश्वास बसायला लागेल. ज्यांच्याशी तुमचा संबंध येतो त्या सगळ्यांच्या तुम्ही ठळकपणे लक्षात राहाल. सर्वसामान्यांसारखे गर्दीचा एक भाग बनून न राहता तुम्ही इतरांपेक्षा वेगळे उठून दिसाल.

ज्यांच्याबरोबर नवीन कामाची सुरुवात होऊ शकते अशा लोकांशी मी संपर्क साधेन असं म्हणा आणि मग त्यांच्याशी ठरवल्याप्रमाणे संपर्क साधा.

मित्राला सांगा की तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुला जेवायला घेऊन जाईन. मग रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करा आणि ठरवल्याप्रमाणे त्याला घेऊन जा.

घरच्यांना सांगा, आपण एखाद्या दिवशी काहीतरी खास असं करू, मग त्याप्रमाणे सगळं ठरवा, आखणी करा (कारण ज्या कामांची व्यवस्थित आखणी केली जाते ती कामं व्यवस्थित पार पडतात). आणि मग ठरवल्याप्रमाणे सगळं घडवून आणा.

होय! ठरवलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यात तरबेज बना. दिलेला शब्द पाळण्यातले तज्ज्ञ बना. दिलेला शब्द न पाळणारे कितीतरी लोक आपल्याला नेहमी दिसतात. खूप जणांना खूप काही करेन म्हणून सांगून ठेवायचं आणि मग ते सगळं करता येत नाही, काही गोष्टी निसटून जातात, असं तुमच्या बाबतीत सहज होऊ शकतं. मी तुम्हाला अगदी नम्रपणे एक गोष्ट सुचवू शकतो का? तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त करण्याचा कोणाला शब्द देऊ नका. त्याऐवजी जेवढं शक्य आहे त्यापेक्षा थोडं कमीच मी करू शकेन असं सांगा. मग जेवढं सांगितलेलं आहे त्यापेक्षा जास्त करून दाखवा. तुम्हाला भाग्य म्हणून लाभलेल्या तुमच्या संपर्कातील प्रत्येकाला.

 

                        आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!