विद्यार्थ्यांचे यश हीच शिक्षकाची कमाई विद्यार्थ्याचे यश हीच शिक्षकाची खरी कमाई असते. शिक्षक विद्यार्थ्यांना जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करतो- विविध कला, कौशल्य, ज्ञान, विज्ञान, व्यवहारज्ञान, नीती, मूल्य, सुसंस्कार, सांस्कृतिक ठेवा, शालेय विषय… आणि बरंच काही. या साऱ्या गोष्टींमधून विद्यार्थी घडत जातो. कोणता विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात चमकेल, याची पूर्वकल्पना कोणालाच नसते. एखाद्या विषयात विद्यार्थ्याला गोडी लागते, त्यामागे बऱ्याचदा मुख्य कारण असतं तो विषय शिकवणारा शिक्षक आणि त्याची शिकवण्याची पद्धत. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो ही कल्पना आज मागे पडत चालली असली तरी, शिक्षकांच्या खांद्यावर बसूनच विद्यार्थी आपल्या ध्येयाची उंची गाठण्याचा प्रयत्न करत असतो. आज शिक्षकाला ‘सेवा पुरवणारा’ (Service Provider), ‘सुलभक’ अशा नावाने संबोधले जात आहे, परंतु त्याची भूमिका मात्र बदलली नाही. शिक्षकाला सर्वाधिक आनंद कधी होतो? – तर आपला विद्यार्थी यशस्वी झाल्यावर. त्यानं काही कर्तबगारी केल्यावर. विद्यार्थ्यांचे परीक्षेतील यश, स्पर्धेतील कामगिरी, त्याची उच्च पदावर नेमणूक.. अशा गोष्टी शिक्षकाला मनोमन सुखावतात. हे सारे क्षण शिक्षकासाठी अपार आनंद देणारे असतात. नवीन तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेऊ शकतं का, यावर आज चर्चा होते आहे. मात्र शिक्षण ही मानवी संवेदनांची देवाणघेवाण असते. विद्यार्थी एक नीतिमान नागरिक व्हावा, यासाठी शिक्षक सतत धडपड करत असतो. विद्यार्थ्याचे यश हीच शिक्षकाची खरी कमाई असते. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे, तर शिक्षक हा त्या उद्याचा आशावादी शिल्पकार !
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
