आई वडीलांनी उपाशी राहून आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षण दिले मुलही अभ्यासात हुषार निघाली दोघांनी शिक्षण घेऊन अमेरिकेत उच्च पदावर नोकरी मिळवली. अमेरिकेत आपले मजबूत बस्तानही बसवले आणि दोघांनीही अमेरिकन मुलीशी लग्न करून तेथेच संसार थाटले, आता त्यांचे भारतात येणं दुर्मिळ झालं. अशातच आई गेल्याची वार्ता दोघांनाही पोहचली. धाकटा मुलगा उशीरा, सर्व सोपस्कार झाल्यावर गावी पोहचला दोन दिवस थांबून त्याने वडीलांच्या हातावर एक लाख रूपये ठेवले व त्यानंतर म्हणाला “बाबा मी निघतोय, आज रात्रीची फ्लाईट आहे.” दुःखी कष्टी बाबा न राहवून बोलले, “अरे तू आलास पण तुझा दादा?” त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, “त्याचं काय आहे बाबा, मी दादाला फोन केला होता, मात्र वर्कलोड जास्त असल्याने त्याला येणे शक्य नव्हते.” तो म्हणाला, “यावेळी तू जा, बाबांच्या वेळी मी जाईन.” बाबा आतल्या आत उन्मळून पडले. डोळयांतून अश्रुच्या धारा वाहू लागल्या उच्चशिक्षण भी दोनही मुलांना देऊ शकलो पण कर्तव्य व माणुसकीचे अर्थात नैतिक मूल्यांचे शिक्षण मी त्यांना देऊ शकलो नाही या विचारांनी त्यांचे अंतःकरण उद्विग्न झाले.
पूर्वी माणसं कमी शिकलेली होती. वाड्यात एका घरात एखादी व्यक्ती देवाघरी गेली. तर सगळया वाड्याला सुतक असायचे. कोणीही आपल्या घरात रेडिओ देखील लावत नसत. ज्या घरात मयत झाली त्या घरातील लोकांना शेजारी-पाजारी न्याहारी, भोजन आणून खायाला घालायचे. मयताच्या सगळ्या विधीमध्ये वाड्यातील लोकांचा सहभाग असायचा वाडा हे एक कुटुंबच असायचे. आज लोक खूप शिकतात. पण खालच्या मजल्यावर मयत झाली असेल तर चौथ्या मजल्यावर दार बंद करून श्रीखंड पुरीचे जेवण चाललेले असते. दुःख सावरायला येणार कोण ? दरवाज्यावर मोठमोठ्या पदव्या असतात पण दरवाजे आतूनच बंद असतात. बिल्डींगमधील लोकांची नावे पण बऱ्याच जणांना माहीत नसतात, असे शिक्षण काय कामाचे ?
आज मुलांना चारित्र्य घडवणारे व मानसिक बल वाढवून, बुद्धी विशाल करणारे, नैतिक मूल्य जोपासणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्यामुळे करूणा – मैत्री – मुदीता- उपेक्षा – निःस्वार्थ वृत्ती उदयास येते असे शिक्षण आज लुप्त झाले आहे.
माणसाच्या मनात दुसऱ्याविषयी आदर-सेवाभाव -मैत्री निर्माण करून माणसाने -माणसाशी -माणसाप्रमाणे वागण्याच्या शिक्षणाची आजच्या पिढीला गरज आहे. कृतज्ञता जागवणारे शिक्षण आज दिले गेले पाहिजे. एक तारखेला पगार घेणे व आयुष्यभर दाराला आतुन कडी लावून घेणे, रस्त्यावर कोणी चक्कर येऊन पडला तरी मला काय घेणे आहे, या विचारसरणीचे उच्चाटन करणारे शिक्षण आजच्या शाळेत शिकवायला हवे. कर्मवीर भाऊराव पाटील मुलांना झोपडी बांधायला शिकवत, स्वयंपाक करायला, शब्दकोश पाहायला शिकवत, रविंद्रनाथ टागोर विदयार्थ्यांना नम्रपणे सर्व प्रकारची कामे करायला शिकवत. इंदिरा गांधींना टागोरांच्या संस्थेत पाठवताना नेहरूंनी टागोरांना कळवले होते, “तिला हाताने काम करू द्या, डोळयाने जग पाहू द्या मनाने विचार करू द्या. माझी मुलगी म्हणून कुठल्याही प्रकारची सवलत तिला देऊ नका.”
अब्राहम लिंकन ने मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात नुसता उल्लेखच नाही तर आग्रह केला होता की, माझ्या मुलाला जगात कसं जगायचं व विषम परिस्थितीत कसं वागायचं हे शिकवा आज जास्त शिकलेले लोक भौतिक जगात अन्यायाविरूध्द दंड थोपटण्यास पुढे येत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” निस्वार्थता, सेवाभाव, चारित्र्य, नैतिकता, संघभावना, देशप्रेम, कर्तव्यभावना, करूणा, मैत्री, कृतज्ञता यांचे संमिश्र शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे त्यासाठी चित्त शुध्द करा. ‘मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास । कठीण वज्रास भेदू ऐसे ।।’ असे स्वाभिमानपूर्वक सांगणारे तुकाराम महाराज देखील आवाहन करतात,
“सकळांच्या पाया माझे दंडवत।
आपले चित्त शुध्द करा.”
या चित्तशुध्दीच्या शिक्षणाची आज नितांत गरज आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
