संगत

जयश्री बारावीला ९५% गुण मिळवून तालुक्यात पहिली आलेली सुस्वभावी, कर्तव्यदक्ष, चारित्र्यसंपन्न, संस्कारक्षम, घरंदाज विद्यार्थीनी बारावीनंतर गावात शिक्षणाची सोय नसल्याने पुण्यात शिक्षणासाठी नामांकित महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला वसतिगृहात ज्युली नावाची मुलगी तिला रूममेट म्हणून मिळाली ज्युली कॉन्व्हेट मधून शिकलेली, मित्रांबरोबर रात्री उशीरापर्यंत फिरणे, पार्ट्या करणे, पबमध्ये जाणे हे ज्युलीसाठी कॅज्युएल होते. एका चौकटीत जीवन जगणाऱ्या जयश्रीला ज्युलीकडून बाहेरच्या त्या मस्तवाल दुनियेतल्या गप्पा ऐकून आकर्षण निर्माण झाले. ज्युली एक दिवस खूप आग्रह करून आपल्या मित्रांबरोबर जयश्रीला सहलीला घेऊन गेली. नकळत त्या ग्रुपमधील एका मुलाने जयश्रीला वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःकडे आकर्षित केले. याकामी ज्युलीने त्या मुलाला पूर्ण मदत केली. जयश्रीचे अभ्यासातील लक्ष उडाले. ती पूर्णतः त्या मुलाच्या प्रेमात अडकली. इतस्ततः फिरणे सुरू झाले. काही महिन्यानंतर त्या मुलाला पोलिसांनी गर्द विक्रीच्या आरोपारून अटक केली. तपासात जयश्रीला पण जबाबासाठी अनेक वेळा पोलीस चौकीत जावे लागले. घरच्यांना हा प्रकार कळाला. कॉलेजमध्ये चर्चेचा विषय झाला. वडिलांनी जयश्रीला शिक्षण अर्धवट सोडून गावी आणले. त्या मुलाला शिक्षा झाली. त्या प्रकाराने जयश्री इतकी खचली कि तिला वेडाचे झटके येऊ लागले. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोरूग्ण म्हणून तिच्यावर उपचार चालू आहेत.
तालुक्याने सत्कार केलेल्या जयश्रीची संगत चुकली. त्याची तिला मोजावी लागलेली केवढी ही भयंकर किंमत म्हणून तर रामदास स्वामी म्हणतात,

“मना तृचि रे एक क्रिया करावी।,
सदा संगती सज्जनांची धरावी॥”

पावसाच्या पाण्याचा थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचे बाष्प होते. हाच थेंब गटारात पडला तर त्याला दुर्गंधी येते हाच थेंब समुद्रात पडला तर तो खारट होते आणि हाच थेंब स्वाती नक्षत्र असेल तर शिपल्यात पडला की त्याचा मोती होतो. थेंब तोच असतो. तो कोणाच्या सहवासात येतो यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. त्याचप्रमाणे पुरूष किवा स्त्री कोणाच्या सहवासात असतात त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असते भगवान बुध्द म्हणतात, “गेंडे कि तरह -अकेला विचरण करे- पर मुखौं कि संगती ना करें।”

एका तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे, तुमचे मित्र कोण-कोण आहेत हे मला-सांगा त्यावरून तुम्ही कसे आणि कोण आहात हे मी खात्रीने सांगू शकतो.
नुकत्याच जन्मलेल्या वाघाच्या पिल्लाला मेंढरांमध्ये सोडलं. वर्षानंतर ते देखील मेंढरासारखं चार पायांवर चालत चालत बे-बे ओरडू लागलं. स्वतःची ताकद व झेप घेण्याची क्षमता हरवून बसलं. बाभळीच्या झाडाच्या शेजारी वाढलेल्या केळीच्या झाडाची सगळी पाने वारा सुसाट सुटला की बाभळीच्या काट्यांनी कराकरा कापली जातात. पानातील रस निघून ती सुकून जातात. याउलट आंब्याच्या झाडाखालील वेल झाडाची मदत घेऊन गगनाला भिडण्याचा प्रयत्न करते. संगतीचा केवढा हा परिणाम एकदा प्रचंड महापूरात नदीपात्रातून दोन भांडी वहात होती. त्यापैकी एक पितळेचे व दुसरे मातीचे. त्या पूरातून वहात जातानाच त्यांच्यात संवाद चालला होता. पितळेचे भांडे मातीच्या भांड्याला म्हणत होते. “अरे इतक्या दुरून का चालला आहेस, ये ना माझ्याजवळ, दोघेही हातात हात घालून जाऊ, कशी मजा येईल बघ तर, मला तुला डोळे भरून पाहता येईल आणि या प्रचंड वेग असलेल्या पाण्यापासून तुझं संरक्षणही करता येईल.” मातीच्या भांड्याने पितळेच्या भांड्याचे आभार मानून म्हटले, “कृपा करून कोणत्याही स्थितीत तू माझ्याजवळ येऊ नको, तुझीच मला सर्वात जास्त भिती आहे. तुझा थोडासा जरी धक्का मला लागला तरी माझ्या ठिकऱ्या उडतील. तुझा माझा देहभाव, स्वभाव भिन्न आहे” म्हणून तर रामदास स्वामी म्हणतात, “जाणत्याच्या संगतीने भजावे। जाणत्याच्या संगतीने झिजावे ।”

शेवटी आयुष्यात चांगला जोडीदार चांगली संगत लाभली तर खालील ओळी सहजपणे ओठातून बाहेर पडतील,
“तेरा साथ है तो मुझे क्या कमी है। अंधेरो से भी, मिल रही रोशनी है।

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!