संयम : एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध

 

महिषासुराच्या अन्यायापासुन आई जगदंबेने जगाला मुक्त केले. म्हणूनच तिला महिषासुर मर्दिनी असे म्हणतात. नऊ दिवस चाललेले घमासान युद्ध आणि दस्याच्या दिवशी श्री जगदंबेने केलेला महिषासुराचा वध ही कथा सर्वांनाच ज्ञात आहे. असुरी प्रवृर्तीवर सगुणांचा झालेला हा विजय फक्त शौर्याचेच प्रतिक नसून ती परीक्षा होती प्रतिकूल परीस्थित दाखविलेल्या संयमाची…
हीच शिकवण हा नवरात्रोत्सव आपल्याला नऊ दिवसांच्या उपवासाच्या माध्यमातून देतो. शारीरिक उपवसातून तुमचे शरीर शुद्ध होते तर मनाच्या उपवासातून तुमचे अंतर्मन पवित्र होत असते. प्रतिकूल परीस्थित अनेकवेळा अपयश येईल पण अशा काळात देखील संयम ठेवल्यास यशापासून तुम्हाला कोणीही दूर ठेवू शकत नाही हीच शिकवण राशीनचा हा शौर्योत्सव आपल्याला देतो.
संयम म्हणजे फक्त वाट बघणं एवढच नाही. प्रयत्नांची पराकाष्तव करीत यशाकडे सुरु असलेला प्रवास…. एक युद्ध : स्वतःच्या विरुद्ध… आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतात की जेव्हा आपल्याला वाटत की आता सर्व संपले. अशा वेळी हताश होवून आपण प्रयत्न करणे सोडून देतो. अनेकदा ज्या ठिकाणी आपण लढण सोडलेलं असत त्याच्या पुढच्याच पावलावर यश आपली वाट बघत असते.
कारण हीच खरी परीक्षा असते संयमाची. आई जगदंबेला सुद्धा महिषासुराचा वध करताना नऊ दिवस संयमाची परीक्षा द्यावी लागली त्यानंतर इतक्या शक्तिशाली असुरी शक्तीचा नायनाट करण्यात यश मिळाले. त्यामुळे आपण सुद्धा लढण बंद न करताना अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला पाहिजे. अपयशाचे स्वागत करत नेहमी कठीण परिस्थितीत संयमाने लढता आले की जिंकणे सोपे होते. या जगात कोणाचेही आयुष्य सुखासीन नाही.
प्रत्येकाला आयुष्याच्या काटेरी वाटेवरून चालत असताना स्वतःची वाट स्वतः शोधावी लागते. पाहिजे त्या गोष्टी मिळाल्या नाही म्हणून येणाऱ्या नैराश्यातून आज शेकडो आत्महत्या रोज होत आहेत. यश मिळाले नाही म्हणून सगळं संपल असे मानून संकटांपासून पळ काढणाऱ्यांना स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवत लढण्याची प्रेरणा आणि अपयशाने खचून न जाता धैर्याने आणि संयमाने पुढे चालत राहण्याची प्रेरणा महिषासुर वधातून आपल्याला मिळते.
प्रत्येक समस्येला समाधान असतेच, फक्त ती वेळ येण्याची संयमाने वाट पहावी लागते. स्वतःच्या अंगभूत गुणांवर विश्वास ठेवून लढण्याची नवचेतना देणारा आणि संयमाची परीक्षा पाहणारा राशीनचा हा दुर्गुणांवर मिळविलेले विजयोत्सव एकदा अनुभवून तर बघा…..

 

 

शब्दांकनः आशिष निंबोरे

error: Content is protected !!