सकारात्मक दृष्टीकोन हवा !

 

सारा निसर्गसंसार हा मानवी मनाचाच खेळ आहे. म्हणून तर म्हणतात, “मन चिंती ते वैरी न चिंती।” मनातील चिंतनावरच आपली उर्ध्वगती किंवा अधोगती ठरत असते. म्हणून उन्नत जीवनासाठी मनाला सकारात्मक विचारांच्या आहाराची गरज असते. नकारात्मक विचार माणसाला दुर्बल बनवतात. म्हणून ब्रिटीश म्हणाले होते, भारतीयांच्या विचारांना मारून टाका म्हणजे ते मरतील राजा हर्षवर्धनाची अंगठी, सैनिकांसमोर चिखलात पडते. अंगठी पडली अपशकुन झाला म्हणून मनाने खचलेल्या सैनिकांना त्यांच्यासमोर अंगठी उचलून-हर्षवर्धन म्हणाला “या अंगठीचा ठसा जसा चिखलात उमटला तसा तुमच्या पराक्रमाचा ठसा या मातीत उमटणार आहे. या सकारात्मक विचारांनी त्याने विजयश्री खेचून आणली.
वीजेच्या दिव्याचा शोध लावताना थॉमस अल्वा एडिसनचे ९९९ प्रयोग फसले, नंतर एक हजाराव्या प्रयोगाला विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्या फसलेल्या ९९९ प्रयोगांबद्दल थॉमस अल्वा एडिसन म्हणाला, माझे ९९९ प्रयोग फसले नाही तर ९९९ प्रयोगातून मी हे सिद्ध केले की या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. जगात सगळ्यात जास्त पेटंट त्यांच्या नावावर आहेत. स्वतःची प्रयोगशाळा डोळ्यादेखत जळून खाक झाल्यावर थॉमस अल्वा एडिसन म्हणाला, “आज माझ्या सगळ्या चुका जळून खाक झाल्या आहेत, चला पुन्हा नव्याने कामाला सुरूवात करू या.” त्यानंतर खरोखरच मित्रांनो केवळ २१ दिवसातच एडिसनने ग्रामोफोनचा देखील शोध लावला. सकारात्मक दृष्टीकोनाचे हे बोलके उदाहरण.
अभ्यासात कच्चा असल्यामुळे ज्याला लहानपणीच वर्गातून हाकलून दिले होते, तो एडिसन सकारात्मक दृष्टीकोनाच्या बळावर जगासाठी वरदानच ठरला.
डेव्हीड व गोलीएथची कथा तर सर्वपरिचित आहे. भल्यामोठ्या राक्षसाच्या त्रासाला कंटाळून गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. गोलीएथच्या पो आलेल्या मेंढपाळ डेव्हीडने गावकऱ्यांना “सकारात्मक विचार” दिला व सांगितले तो राक्षस अवाढव्य भलामोठा असल्यामुळे त्याला मारण्यासाठी अचूक नेम आवश्यक नाही. सगळ्या बाजूंनी दगड-विटा-बाण मारून आपण त्याला नष्ट करू शकतो कारण अवाढव्य आकारमानामुळे तो जलद पळूही शकत नाही व कसेही मारले तरी त्याला कोठेतरी लागणारच. पुढे त्या राक्षसापासून गावकऱ्यांची सुटका झाली. म्हणजेच काय योग्य मार्गान केलेल्या सकारात्मक विचाराने राक्षसरूपी संकट नष्ट होऊ शकते.
स्वामी विवेकानंद म्हणतात. तुम्ही आज जे काही आहात, हे गतकर्माचेच फळ होय, त्याला तुम्हीच जबाबदार आहात म्हणून त्या स्थितीला, व्यक्तीला धन्यवाद द्या. अन्यथा आज तुम्ही येथे कसे असता ? हे जग एक विशाल व्यायामशाळा आहे, सकारात्मक विचारांनी मनाला सबल बनवा. लहानपणी हत्तीच्या पिल्लाच्या पायांना साखळदंडानी बांधून ठेवले की हत्ती मोठा झाल्यावर, नुसता साखळदंड त्या खुंटीला अडकवला तरी तो निमूटपणे उभा राहतो. त्याकडे असलेल्या ताकदीने एका दणक्यात तो साखळदंड व खुंटी तोडू शकतो. पण मनात असलेला नकारात्मक विचारच त्याला त्या साखळीचा गुलाम बनवतो.
यश हे मनाच्या ताकदीवर अवलंबून असते. म्हणून मनातील नकारात्मक भावना दूर करून मनाला स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी त्याला ध्यानाची जोड द्या, व सकारात्मक व्हा.

सकारात्मक होण्यासाठी सप्तपदी:-

 

१) सकाळी उठल्यावर ठरवा, आज मी फार उत्तम काम करणार आहे.
२) नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर रहा.
३) आधी मिळालेल्या यशाचा वारंवार विचार करा. ते तुम्हाला प्रेरणा देईल.
४) इतरांशी तुलना करणे सोडून द्या.
५) रोज सकारात्मक विचार वाचा, ध्यान करा
६) योग्य आहार-विहार-व्यायामाकडे लक्ष द्या.
७) पाठीचा कणा बसताना चालताना ताठ ठेवा.

मित्रांनो, मन दुर्बल होणार नाही याची पूर्णतः काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही. श्री ईडियट्स मधील अमीर खान देखील ‘सकारात्मक दृष्टीकोन’ सांगताना म्हणतो,  “भैय्या -ऑल इज वेल”!

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!