सर मला झोपच येत नाही

झोपायची वेळ रेडिओवर एक गाणं लागलं होतं. “लिबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही”. मला केतनची आठवण झाली. केतनला झोपच व्यवस्थित येत नव्हती म्हणून खूप नैराश्य आले होते. रात्रभर तो काळजी करत व्याकुळ व्हायचा त्यामुळे त्याच्या जीवनावर या गोष्टीचा खूप गंभीर परिणाम झाला होता. मी त्याला म्हणालो केतन ही परिस्थिती बदलण्यासाठी तू बिछान्यात पडल्यावर झोप आली नाही तरी काळजी करायची नाही नुसते डोळे मिटून शरीर सैल सोडून सर्व चिंता व काळजी नकारात्मकता मी टाकून देत आहे, असे वारंवार म्हणायचे व श्वास जाणत पडून रहायचे. एकाच आठवड्यात केतनला गाढ झोप यायला लागली निद्रानाशापेक्षा त्यावर करत असलेली चिंता तणावग्रस्त करते व झोप गायब होते.
डॉ. नॅर्थेनिअल कलेटमन हे शिकागो विद्यापीठातील प्रोफेसर होते त्यांनी झोप या विषयावर सर्वोच्च संशोधन केले. ते म्हणतात, निद्रानाशापेक्षा त्यावरच्या काळजीचे विचारच माणसाला दुर्बल करतात. छान झोप लागण्यासाठी सकारात्मक विचार अंतर्मनाला वारंवार द्या, श्रमाची कामे, व्यायाम, खेळ याद्वारे शरीराला दमवा.
झोपेमुळे प्रत्येक अवयवांना विश्रांती मिळते. शरीरशास्त्र सांगते झोप ही एक प्रकारची स्नायू शिथीलीकरण प्रक्रिया आहे. कष्टकरी मनुष्य लगेच झोपतो. पण विचारवंत वकील, प्राध्यापक, नेते हे मनाला लगेच विरक्त करू शकत नाहीत. गुन्हेगारांकडून गुन्हयाची माहिती काढण्यासाठी पोलिस त्याला झोप मिळू देत नाहीत. त्यामुळे तो शरीर व मनाने दुर्बल होऊन अखेर शरणागती पत्करतो.
महर्षी चरक म्हणतात सुख व दुःख, सशक्तपणा व अशक्तपणा, जीवन व मृत्यू या सगळ्यांचा आधार झोप आहे. पोट मोकळे असताना मुजंगासनाची ८/१० सेकंदाची आवर्तने केल्यास व दीर्घ श्वसन केल्यास छान झोप लागते.
चांगली झोप येण्यासाठी उशीरापर्यंत टी.व्ही. पाहणे, रात्री व्हॉटस्अॅप व फेसबुकवर उशीरापर्यंत चॅटींग करत बसणे हे बंद करा. रात्रीचे जेवण लवकर करा. रूक्ष किवा निरस पुस्तकांचे वाचन करताना मेंदूत हलका शीण येतो. त्यामुळे झोप येते. झोपताना पाणी पिऊ नका त्यामुळे लघवीसाठी मध्येच जाग येते. झोपण्यापूर्वी चहा, कॉफी घेऊ नका, त्यामुळे मेंदू उत्तेजित होतो. रात्री कोमट पाण्याने स्नान केले तरी झोप येण्यास मदत होते.
दुपारी १० ते १५ मिनिटे वामकुक्षी घ्या. विन्स्टन चर्चिल व रॉक फेलर ही दोन माणसे दुपारची वामकुक्षी कधीच चुकवीत नव्हते. युध्द काळात विमाने डोक्यावर घिरट्या घालताना पण चर्चिलने हक्काची डुलकी चुकवली नाही. रॉक फेलर हा तर ९७ वर्षे जगला.
डोक्याला तेलमसाज केल्यामुळे मोनोटोनीज मुळे झोप येऊ लागते. दुधामध्ये एक चमचा मध टाकून पिल्यास शांत झोप येते. समाधानी कामजीवन हा आनंदाचा व गाढ झोपेचा राजमार्ग आहे. त्याकडे लक्ष असू द्या. हिंसक मालिका, बातम्या रात्री पाहू नका. शक्यतो डाव्या कुशीवर व पूर्व-पश्चिम झोपण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा सुर्यास्तानंतर निसर्ग पण निद्रेच्या आहारी जातो. पाखरे घरट्यात जातात, जनावरे गोठ्यात शिरतात, माणूस मात्र मोकाटच असतो. म्हणून सुर्याप्रमाणे माणसांनाही उगवता व मावळता आले पाहिजे. अशा पध्दतीने सकारात्मक विचारांनी निद्रानाश दूर करून निद्रा सुखाचा सुंदर अनुभव घ्या व वरील सर्व उपायांनी ज्यांचा निद्रानाश दूर होत नाही त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!