एक खारुताई रोज आपले काम इमानेइतबारे करत असे.
ती जरुरीपेक्षा जास्त काम करूनपण खुश राही. कारण ती ज्यासाठी काम करत होती, त्या जंगलचा राजा सिंहाने तिला १० पोती अक्रोड द्यायचा शब्द दिला होता. खारुताई काम करताकरता थकली की तिला थोडा आराम करावा असे वाटे. पण तिला लगेच राजाचा शब्द आठवायचा आणि परत कामाला लागायची. खारुताईला जेव्हा इतर खारी खेळताना, मस्ती करताना दिसत तेव्हा तिलापण खेळायची इच्छा व्हायची, पण लगेच तिला अक्रोड आठवायचे आणि ती परत कामाला लागायची. राजा खूप इमानदार होता. त्याने शब्द दिला होता तर तो निश्चित पूर्ण करणार. असाच एक दिवस उजाडला आणि सिंहाने खारुताईला १० पोती अक्रोड दिले आणि तिला स्वातंत्र्य बहाल केले. अक्रोडांच्या पोत्यांवर बसून खारुताई विचार करू लागली. की आता या अक्रोडांचं मी काय करू…? आख्खं आयुष्य काबाडकष्ट करून मी दातांचा भुगा करून घेतला, आता अक्रोड चावायला दात कुठे आहेत? ही गोष्ट आज आपल्यापैकी अनेकांची जीवन कहाणी बनली आहे. रिटायरमेंटनंतर एकदम निवांत राहायचं फुल मजा करायची म्हणून काहीजण रात्रंदिवस नुसतं पैशाच्यामागे पळत सुटतात. ओवर टाईम करतात. नोकरीला जोडून इतर काही व्यवसाय चालू करतात. आरोग्याकडे दुर्लक्ष होतं मनाकडे दुर्लक्ष होतं. आजारांनी शरीर पोखरलं जातं. मंग रिटायरमेंट नंतर मजा करायला शरीर साथ देत नाही. त्याचप्रमाणे ज्यांच्यासाठी काबाडकष्ट केले ती घरातली मंडळीपण दुर्लक्ष करू लागतात. बऱ्याच घरात वडिलांच्या रिटायरमेंटच्या पैशाकडे घरातील मंडळींचे लक्ष असते. त्यासाठी बऱ्याच घरांत वडिलांबरोबर वादविवाद चालू होतात. शेवटी दुःख पदरात येण्याची प्रक्रिया चालू होते. मग जीवन असह्य होऊन जाते.
अभय व शिल्पा दोघेही भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काबाडकष्ट करत, नुसती पळत होती. घरातील एकुलत्या एका मुलाला वेळ न दिल्यामुळे तो मुलगा व्यसनाच्या आहारी गेला. आज त्याला वेगवेगळ्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावे लागत आहे. यांनी कमावलेला सगळा पैसा मुलाच्या ट्रीटमेंटसाठी खर्च होत आहे. मुलावर आलेल्या या परिस्थितीमुळे विचार करून करून दोघांची तब्येत बिघडली आहे. दोघंही वैद्यकीय ट्रीटमेंट घेत आहेत. कमावलेला संपूर्ण पैसा खर्च झाला आहे. व घराची दैन्यावस्था झाली आहे. रिटायरमेंटनंतर कोणासमोर हात पसरायचा नाही, फुल मजा करायची या विचाराने पेटलेला विनय रात्रंदिवस पैशाच्या मागे धावत होता. त्याने बायकोलापण जॉब करण्यासाठी आग्रह केला. विनयच्या एकुलत्या एका मुलीला घरामध्ये आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही. वेळ मिळाला नाही आणि कॉलेजमध्ये अचानक ती एका परप्रांतीयांच्या प्रेमात पडली आणि तिने आईवडिलांना न सांगताच लग्न केले. हा परप्रांतीय गुन्हेगारी प्रवृत्तीचा, व्यसनी निघाला. प्रॉपर्टीच्या नुसत्या गप्पा सांगून भपका करून त्याने मुलीला पद्धतशीर आपल्या जाळ्यात ओढले. मुलीची झालेली ही दयनीय अवस्था बघून दोघं नवरा-बायको डिप्रेशनमध्ये गेली आहेत. त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांची ट्रीटमेंट चालू आहे..
रिटायरमेंटनंतर निर्वात राहायचं म्हणून आत्ताच भरपूर पैसे करून घ्या म्हणून डबल डयुटी करणाऱ्या आनंदाने आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आणि वयाच्या ५० व्या वर्षी त्याला हार्ट अटॅक आला. हृदयाचे मोठे ऑपरेशन केल्यामुळे आज तो मनाने खूप खचला आहे. जगण्याची उमेद नष्ट झाली आहे. नोकरीमध्ये अवजड काम असल्यामुळे ते करता न आल्यामुळे त्याला नोकरी सोडावी लागली आहे. त्याची बायको घर चालवण्यासाठी एका फर्ममध्ये १२ हजार रुपयावर नोकरी करायला जात आहे. घरामध्ये खूप ओढाताण चालू आहे.
मित्रांनो, अशा अनेक घटना मी समाजात पाहत आहे. त्या वेळेला लक्षात येतं मी उद्या मजा करेन अस म्हणणाऱ्या लोकांच्या आयुष्यात उद्या कधी येतच नाही. शेवटी ते दुःखमय, यातनामय जीवन जगत राहतात. म्हणून उद्या मजा करू म्हणून आज शरीराकडे व मनाकडे दुर्लक्ष करू नका या क्षणात जीवनाचा आनंद घ्यायला शिका. आपल्या आरोग्याकडे लक्ष घा. आपल्या मनाकडे लक्ष द्या. आपल्या मुला-बाळांना कुटुंबाला वेळ घा आणि कुटुंबासह जीवनाचा आहे त्या परिस्थितीत आनंद घ्या. अमिताभ बच्चनच्या सिनेमामधले एक गाणं मुद्दाम या ठिकाणी नमूद करतो.
“जिंदगी तो बेवफा है. एक दिन ठुकरायेगी
मौत मेहबुबा अरे अपनी, साथ लेकर जायेंगी…..”
मृत्यू कधीही येऊ शकतो. म्हणून मिळेल त्यात समाधान मानत प्रगतीच्या पथावर चालताना जीवनाचा आनंद घ्यायला शिका. ‘कल क्या होगा किसको पता, अभी जिंदगी का लेलो मजा…’ त्यासाठी शरीरासाठी व्यायाम व मनासाठी विपश्यना ध्यान साधना करा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
