बायकोचे महत्व

एकदा मालकाने गुलाब नावाच्या कर्मचाऱ्याला विचारलं, “तू बायकोला एवढं महत्त्व का देतोस?” त्यावेळेस गुलाब मालकाला म्हणाला, “साहेब, पत्नी कोणतेही नाते नसतानादेखील कायमची आपली होऊन जाते. आपले सगळे नाते सोडून ती आपल्या सोबत येते आणि आपले सगळे सुखदुःख एकत्र जगते. आणि शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करते.” तो पुढे म्हणाला, “साहेब, पत्नी म्हणजे केवळ एक नाते नाही, तर अनेक नात्यांचा भांडार आहे. जेव्हा ती आपली सेवा करते, आपल्यावर प्रेम करते, तेव्हा ती एका आईप्रमाणे करते. जेव्हा ती जीवनातील उतारचढावाबद्दल सूचित करते आणि मी आपली सगळी कमाई तिच्या हातात देतो, कारण मला माहीत आहे कि, ती आपल्या घराचे हित साधेल तेव्हा ती एका पित्या सारखी असते.” तो पुढे म्हणाला, “जेव्हा ती आपली काळजी घेते, आपले लाड करते, आपल्या चुकांवर रागावते, आपल्यासाठी खरेदी करते, तेव्हा ती आपल्या बहिणीप्रमाणे होते. जेव्हा ती आपल्याकडे नवनवीन फर्माईश करते, नखरे करते, रुसते, हट्ट करते तेव्हा ती मुलीसारखी होते. जेव्हा ती आपल्यासोबत सल्लामसलत करते, कुटुंब चालवण्यासाठी सल्ले देते,भांडण करते, तेव्हा एका मित्रासारखी होते. जेव्हा घरातील सगळे देणेघेणे, खरेदी, घर चालवण्याची जिम्मेदारी उचलते, तेव्हा ती एक मालकीण होते.” तो पुढे म्हणाला, “आणि जेव्हा ती सगळ्या जगाला विसरून एवढेच नाही आपल्या मुलांना देखील सोडून आपल्या मिठीत येते, तेव्हा ती प्रेमिका, अर्धांगिनी, आपला प्राण आणि आत्मा होते. जी आपले सर्वस्व आपल्या स्वाधीन करते.”
“मी तिचा सन्मान करतो, तर हे काही चूक करतो का, साहेब?”
मालक सगळे बोलणे ऐकत होता. हे सगळे ऐकून तो स्तब्ध झाला. एका निरक्षर आणि गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीकडून आज जीवनाचा नवीन विचार मालकाला मिळाला होता.
मित्रांनो, आपल्या घरातील जीवनसाथीचा आदर करा…

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

 

error: Content is protected !!