एका गावात दोन साधू राहत होते. सकाळी उठून मंदिरात पूजाअर्चा करायचे आणि मग दिवसभर भिक्षा मागायचे आणि रात्री मंदीराशेजारीच झोपडीत रहायचे. एक दिवस गावात जोराचे वादळ आले आणि त्यानंतर लगेचच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा जोर इतका होता की त्यात अनेक झाडे, प्राणी आणि अक्षरशः मोठमोठे दगडही वाहून गेले.
सायंकाळी दोघे साधू आपल्या झोपडीजवळ आले असता पाहतात तर काय त्यांची अर्धी झोपडी तुटलेली होती. केवळ वरचे छत मात्र तसेच शिल्लक होते. तुटलेली झोपडी पाहताच पहिला कमालीचा क्रोधित झाला आणि मंदिरातील देवाकडे पाहून बडबडू लागला,
“अरे परमेश्वरा, मी नेहमी मनोभावाने तुझी पूजाअर्चा करूनही तू नेहमीच माझ्याशी अन्याय का करतोस? दिवसभर मुखात तुझे नाव घेऊनही तू माझी झोपडी तोडलीस, आणि कधीही तुझ्या दाराशी न येणाऱ्या पापी मनाच्या माणसाच्या घराला धक्कादेखील लागला नाही. तू क्रूर आहेस आम्ही तुझी भक्ती करतो पण तू आमच्यावर दया कधीच करत नाहीस.”
तितक्यात दुसरा साधू आला. झोपडीकडे पाहून आनंदाने नाचू लागला आणि उद्गारला, “हे परमेश्वरा! तू आमच्यावर किती प्रेम करतोस ते। कारण तु आमची अर्धी झोपडी वाचवलीस. अशा भर पावसात तर झोपड्या पुर्ण उद्ध्वस्त होऊन जातात. पण तुझी खरंच कृपा आहे की आज आमच्या डोक्यावर निदान छत तरी आहे. आता मी उद्यापासून आणखी जोमाने तुझ्या भक्तीत स्वतःला वाहून घेणार, खूप खूप धन्यवाद, परमेश्वरा!”
दुसरा साधू या उद्गारांनी निरुत्तरित झाला आणि फक्त अवाक होऊन आपल्या साधू मित्राला न्याहाळत राहिला.
मित्रांनो, एक घटना आणि एकसारखेच दोन व्यक्ती! परंतु दृष्टिकोन हे त्यांच्यातील वेगळेपण ठरते. एकाने त्या घटनेच्या दुःखात स्वतःला इतके खोलवर नेले की त्याने इतरांना दोष द्यायला सुरुवात केली, परंतु दुसऱ्याने त्या घटनेकडे सकारात्मकरित्या पाहिले व आभार व्यक्त केले.
या दोघांत दुसरा साधू इथे सर्वश्रेष्ठ व सर्वांत आनंदी ठरला तो फक्त आणि फक्त त्याच्यात असणाऱ्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे. आपला दृष्टीकोन आपल्या भविष्याची जडणघडण ठरवित असतो म्हणूनच आपले भविष्य त्याचवेळी बदलेल जेव्हा आपला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. म्हणून नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
