संघर्ष तुम्हाला बलवान बनवतो.
बऱ्याचदा संघर्षाचा काळ हाच खरा गुरू असतो आणि तोच तुमच्या पुढील यशाचा मार्ग निश्चित करतो. सुरवंट आणि त्याचा कोष हे उदाहरण अतिशय प्रभावीपणे अधोरेखित करते.
एका मुलाला घरच्या अंगणात सुरवंटाचा कोष मिळाला. काही दिवसांनी त्यात एक बारीकसे छिद्र आढळून आले. पुढील बराच काळ अतिशय संयमाने तो फुलपाखराला त्या बारीकश्या छिद्रातून बाहेर पडण्यासाठीची धडपड करताना पाहत राहिला. नंतर जणूकाही आपल्याला ह्यातून बाहेर पडताच येणार नाही असे वाटून त्याने बाहेर पडण्याची आपली धडपड थांबवली.
त्या फुलपाखराला मदत करण्याच्या उद्देशाने त्या मुलाने कात्रीने त्या कोषाचे छिद्र काहीसे मोठे केले जेणेकरून फुलपाखरू सहजतेने बाहेर येऊ शकेल.
पण काहीतरी विचित्रच घडले. फुलपाखराचे सगळे शरीर सुजले होते आणि पंखही अविकसित होते. फुलपाखराचे शरीर मोठे होण्याची आणि त्याचे पंख पूर्ण विकसित होण्याची मुलगा मोठ्या अपेक्षेने वाट पाहत राहिला. पण यातील काहीही झाले नाही. उलट फुलपाखरू आपले सगळे उर्वरित आयुष्य घरभर आपल्या सुजलेल्या अंगाने आणि विकलांग पंखाने सरपटत राहिले आणि कधीही उडू शकले नाही. मांजराने झडप टाकून त्याला पंजा मारला आणि त्याचा अंत झाला.
फुलपाखरावर दया दाखविण्याच्या भरात मुलाच्या हे लक्षात नाही आले की बाहेर पडायला महाकठीण असलेला कोष आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष हे फुलपाखराच्या शरीरातील पोषक घटक त्याच्या पंखापर्यंत पोहोचविण्याचा निसर्गाचा एक मार्ग आहे, जेणेकरून कोषातून बाहेर आलेल्या फुलपाखराला उडता येते.
कधीकधी हा असा संघर्षच आपल्या आयुष्यात अतिशय आवश्यक असतो. ज्यावेळेस आयुष्यात तुम्हाला अनेक अडचणी येत असतात. त्यावेळेला निसर्ग तुम्हाला सर्व अंगांनी बलवान बनविण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून त्या अडचणींचा सामना करा आणि यशाचे भागीदार व्हा.
“मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनोंमे जान होती है. पंख होनेसे कुछ नहीं होता, होसलो की उडान होती है…”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
