दृष्टिकोन-बदला

दोन नवोदित चित्रकारांनी राजाचे चित्र काढले. दोघांची चित्रं राजाला खूप आवडली. त्या चित्रकारांचा गौरव करण्यासाठी राजाने त्यांना दरबारात बोलावले. प्रत्येकाला एक उत्तम शाल व चांदीचे ताट राजाने भेट दिले, व त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यापैकी एक चित्रकार चांदीचे ताट मिळाले म्हणून खुशीत बाहेर पडला तर दुसरा चित्रकार मात्र उदास झाला होता. ज्या वेळेला त्याला उदासीचे कारण विचारले, तर तो म्हणाला, “अहो राजा सोन्याचे ताटदेखील बक्षीस म्हणून देऊ शकला असता, पण तो चेंगट आहे. एवढं भारी चित्रं काढलं पण राजाला त्याची किंमतच नाही.” पहिला चित्रकार म्हणाला, “आपण काढलेल्या चित्राची राजाने स्तुती केली, राजाने आपला सत्कार करून सन्मान केला, आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. कलेची जाण असणारा, कलाकाराचा सन्मान करणारा राजा खरोखरच खूप चांगला आहे.”
पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे, ती पाण्याच्या पेल्याची. हा पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा असे विचारल्यावर विविध उत्तरे येतात. कोणी म्हणते अर्धा भरलेला, अर्धा रिकामा. तर काहींच्या मते अर्ध्या जागेत पोकळी आहे. शेवटी हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. घटना एकच असते; पण प्रत्येक व्यक्तिगणिक त्या घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन भिन्न असल्याने एखादी व्यक्ती खट्टू होते, तर एखादी व्यक्ती खूप आनंदते तर एखादी अतिशय दुःखी होते. त्यामुळेच तर ‘जशी दृष्टी तशी सृष्टी’ असे म्हटले जाते.
कोणत्याही व्यक्ती, घटना, परिस्थितीकडे पाहाण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते. त्यामुळे आपल्या विचारात नेमकेपणा, सकारात्मकता असेल तर आपण आनंदी राहू शकतो. अनेकदा मनाचे डोळे उघडावे लागतात आणि विचार बदलावे लागतात. तर आयुष्य बदलू शकते. व्यक्तीचे जसे विचार तशी ती व्यक्ती होते.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!