नमस्काराची ताकद

एका मोठ्या कंपनीचा वरिष्ठ अधिकारी सोमण कंपनीतील सर्वजण घरी गेल्यानंतर राऊंड घेताना चालताचालता अचानक पाय घसरल्याने एका मशीनच्या धोकादायक भागात अडकून पडला. त्याने बराच आरडाओरड केली. पण कंपनी सुटलेली असल्याने कोणीही कर्मचारी तिथे नव्हता. खूप प्रयत्न करूनही त्याला मशीनच्या बाहेर पडता येत नव्हते. खूप खटपट केली, आरडाओरडा केला, मदतीसाठी हाका मारल्या पण शेवटी तो हतबल होऊन तसाच त्या ठिकाणी बसून राहिला.
अचानक त्याला पहारेकऱ्याच्या ओरडण्याचा आवाज आला. ‘साब कहां पर हैं आप?’ त्यावेळी सोमण साहेबांनी ओरडून त्याला बोलावले. वॉचमनने परिस्थिती पाहिली व पूर्ण ताकदीने साहेबांचा पाय मशीनमधून सोडवला. साहेबांना आधार देत पहारेकऱ्याने त्यांना केबिनमध्ये नेऊन बसवले. त्यानंतर तो बाहेर पडून जवळच असलेल्या डॉक्टरांना घेऊन आला.
डॉक्टरांनी तपासल्यानंतर, सोमणसाहेबांना औषधे, पाणी दिल्यावर जरा हुशारी वाटली. डॉक्टर निघून गेले. त्यानंतर सोमणसाहेबांनी त्या पहारेकऱ्याला विचारले की, “अरे, सगळी कंपनी बंद झालेली असताना तुला आत येण्याची बुद्धी कशी काय झाली? तू तर नेहमीच गेटवर असतोस ना?”
तेव्हा वॉचमन म्हणाला की, “साहेब, तुम्ही रोज येता-जाता मला नमस्कार करता, माझ्याकडे हसून पाहता. तुमच्या हास्याची मी वाट पाहत असतो. आज कंपनी सुटून बराच वेळ झाला होता. मी विचार केला की साहेबांची गाडी तर बाहेर लावलेली दिसते. पण आज साहेब काही दिसले नाहीत. मग साहेब गेले तरी कुठं? असा विचार करून कंपनीत आत जाऊन पहावं असा विचार मनात आला आणि मग आत आलो. तुमच्या केबिनमध्ये पाहिले तर तुम्ही तिथे नव्हता. मग तुम्ही कुठे असाल असा विचार करत आत आलो. तेव्हा तुमचा आवाज आला आणि पाहिले तर तुम्ही अडकून पडलेला दिसला. काय झाली होती तुमची अवस्था.”
पहारेकऱ्याचे बोलणे ऐकून सोमण साहेबांना गहिवरून आले. एक साधे हसू आणि नमस्कार या रूपात पेरलेले माणुसकीचे बीज आज उगवले होते. शिवराज गोर्ले नावाचे एक लेखक आहेत, ते म्हणतात, “जी माणसं एक वर्षांचा विचार करतात ती शेती करताना बियाणे लावतात, जी माणसे दहा वर्षांचा विचार करतात ती झाडे लावतात. मात्र ज्या व्यक्ती आयुष्याचा विचार करतात ती माणसं माणसे जोडतात.”
माणसे जोडण्यासाठी फार काही करावे लागत नाही, तर माणुसकीने वागावे लागते, माणुसकी जपावी लागते.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

 

error: Content is protected !!