रमेश आणि मीनाचे थाटामाटात लग्न झाले. दोघेही उच्चशिक्षित. लग्न झाल्यानंतर दोघेही फिरायला गेले. तिकडूनं आल्यानंतर दोघेही एकमेकांची खूप काळजी घेत असत. रमेश बऱ्याचदा मीनाला ऑफिसला सोडायला जायचा वेळ मिळाला तर तिला आणायला जायचा. तिच्या आवडीच्या गोष्टी घेऊन यायचा. तिच्या आई-वडिलांचा खूप आदर करायचा बऱ्याचदा सासरी जायचा. रमेशच्या आई-वडिलांनी रमेशला सांगितलं, ‘रमेश, बायकोचे जास्त लाड करायचे नसतात. नाहीतर ती तुझ्या डोक्यावर बसेल. त्यामुळे तिला तुझ्याबद्दल भीती वाटलीच पाहिजे असे वाग. तिला धाकात ठेव, नाहीतर तुला भविष्यात अडचणी येतील.’ आई-वडिलांनी हा विचार रमेशच्या मनात बिंबवला. इकडे मीनाची आई सारखी वेळ मिळाला की, रोज फोन करून तिच्या संसाराविषयी, तिच्या सासरच्या लोकांबाबत चौकशी करायची व आपल्या मुलीला थोडाही त्रास होणार नाही, जास्त कष्ट पडायला नको, म्हणून तिला सल्ला द्यायची. मीनाच्या आईनेदेखील मीनाला जास्त काबाडकष्ट करू नको. सासूला पण काम करू दे. नवऱ्याला आपल्या मुठीत ठेव जमले तर वेगळे राहायला जा. अशा अनेक प्रकारच्या उपदेशाचे डोस पाजले. त्यामुळे मीनादेखील सासरी मनापासून काम करेनाशी झाली. व सासूला काम सांगू लागली. नवऱ्याला मुठीत ठेवण्यासाठी तिने वेगवेगळे प्रयोग चालू केले. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना अर्थात ऑर्डर ती देऊ लागली. इकडे रमेशच्या आई-वडिलांनी हिता धाकात ठेव असा उपदेश केला होता. तिकडे मीनाच्या आईने नवऱ्याला मुठीत ठेव असा उपदेश केला होता. त्यामुळे दोघेही पालकांच्या उद्देशानुसार एकमेकांच्या विरोधात ताकद लावू लागले. व दोघांमध्ये भांडणे चालू झाली. परिणाम हात उचलण्यापर्यंत झाले व मीना घर सोडून माहेरी निघून गेली. प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले आहे.
पालकांनो, आता तरी सावध व्हा. आपल्या मुलामुलीच्या संसारामध्ये शक्यतो ढवळाढवळ करू नका. पाखरं मोठी झाली की, आकाशात सोडून द्यायची असतात. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. जुन्या चालीरीतींना धरून बसू नका. कुठल्याही उपदेशाचे डोस आपल्या मुलांना पाजू नका. नाहीतर तुमच्या मुलांचे भवितव्य धोक्यात येऊन त्यांची आयुष्य उध्वस्त होऊ शकतात, हे लक्षात ठेवा.
खलिल जिब्रान म्हणतो, ‘मुलांना प्रेम द्या, भरपूर स्वातंत्र्य द्या, पण आपले जुने विचार त्यांना देऊ नका. त्यांना त्यांच्या आधुनिकपणाने घोडदौड करू द्या.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
