काही वर्षांपूर्वी एका वर्कशॉपमध्ये मी पुढच्या रांगेत बसलेल्या पाच लोकांना एक झेरॉक्सचा कोरा कागद दिला. त्यांना आपल्या जोडीदाराविषयी चांगले दहा गुण लिहावयास सांगितले. यात महिला व पुरुष दोघांचा सहभाग होता. ठराविक वेळेनंतर त्या पाचही जणांचे कागद जमा करण्यात आले. त्या कागदाचे अवलोकन करून त्या-त्या मंडळींशी वैयक्तिक वार्तालाप करण्यात आला. या प्रयोगानंतर मला असे आढळून आले की, ज्या व्यक्तीनी आपल्या जोडीदाराबाबत चांगले भरपूर गुण लिहिले होते, त्यांचे जोडीदाराशी असलेले नाते खूप चांगल्या पद्धतीचे होते व ज्यांनी जोडीदाराबाबत चांगले गुण लिहिताना हात आखडता घेतला होता. त्यांचे जोडीदाराशी असलेले नाते पूर्णतः सुदृढ नव्हते.
मित्रांनो कौतुक ही प्रत्येक माणसाची नैसर्गिक भूक आहे ही भूक जो भागवतो तो माणूस त्याचे समोरच्याशी असलेले संबंध हे अधिक दृढ करत असतो. त्यामुळे ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला जोडीदाराचे कौतुक करा.
आज प्रयोगांती हे सिद्ध केले गेले आहे की, जेव्हा वनस्पतींची स्तुती केली जाते किंवा त्यांच्याशी बोलले जाते, तेव्हा त्यांची जोमाने वाढ होत असते; परंतु जेव्हा त्यांचा उपहास केला जात असतो किंवा त्यांना नाकारले जात असते, तेव्हा त्यांची वाढ खुंटते किंवा त्या वनस्पती सुकूनही जात असतात. वनस्पतीच्या बाबतीत तुम्हाला हा अनुभव आला असेल, तर तुमच्या कृतीचा वा उक्तीचा मानवी जीवनावर किती परिणाम होत असतो. याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल.
तुम्हाला तुमच्या जीवनात किती यश मिळणार आहे. हे तुम्ही लोकांना देत असलेल्या प्रेमाचे निश्चित सामर्थ्यच ठरवित असते. म्हणून सर्वांशी प्रेमाने वागा. तुमच्या यशाचा हा पाया आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
