नगरसेवक, भगीरथ भाईने रस्त्यावरून जात असताना एका फळ विक्रेत्याने मध्येच गाडी थांबवल्यामुळे व भाईच्या गाडीला अडथळा आणल्यामुळे, भगीरथभाईने त्या फळ विक्रेत्याला दोन-चार शिव्या हासडल्या. त्या फळ विक्रेत्याने चिडून जाऊन भगीरथ भाईला गाडीवरची दोन-चार संत्री फेकून मारली. व त्याच्या अंगावर धावून गेला. साहेबांचा फार मोठा अपमान झाला. या नगरसेवकांनी आपली ताकद अयोग्य ठिकाणी वापरली होती.
अशीच एक काल्पनिक घटना, ऋषीमुनींनी आपला शिष्य विश्वभर याला मृत प्राण्याला जिवंत करणारा विशेष मंत्र शिकवला. व तो मंत्र त्याला सिद्ध करून दिला. पण या मंत्राचा वापर कोठे करावा याचे मात्र विश्वभरला भान नव्हते. एकदा तो जंगलामध्ये गेला असता, एक वाघ मरून पडलेला त्याला दिसला. त्याच्याबरोबर बरेच मित्र होते. म्हणून अहंकारापोटी मी या वाघाला जिवंत करतो. असे तो मित्रांना म्हणाला. हे सगळे मित्र म्हणाले आम्हाला अगोदर झाडावर चढू दे आणि आम्ही वरूनच तुझा प्रयोग बघतो. म्हणून सर्व मित्र झाडावर चढले व विश्वंभरने गुरूने शिकवलेला मंत्र अकरा वेळा म्हणला, आणि वाघ डरकाळी फोडत उठला. त्या वाघाने विश्वंभरला झडप घालून ठार मारले. व त्याचे मांस खात वाघ बसला.
मित्रांनो, आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याचा योग्य ठिकाणीच उपयोग करा. नाहीतर तुमची स्वतःचीच हानी होईल. मग सामर्थ्य कोठे व कसे वापरायचे? यासाठी प्रज्ञा विकसित करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने रोज ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. ध्यानाच्या अनेक पद्धतींमध्ये विपश्यना ध्यानधारणा ही शास्त्रोक्त पद्धत आहे. यामुळे मनाची सबलता व निर्मलता होते, भय कमी होते, चंचलता दूर होते, आकलन शक्ती वाढते व प्रज्ञा विकसित होते. विपश्यना ही शास्त्रोक्त ध्यानपद्धती असून गौतम बुद्धांनी २५०० वर्षांपूर्वी ही ध्यानपद्धती शोधून काढली आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
