अतिथी गृह…

 

एक राजा आपल्या ऐश्वर्यसंपन्न राजवाड्यात खूप मजेत राहत होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा खूप गर्व होता. तो गर्वाने अगदी फुलून गेला होता. तो नेहमी इतरांजवळ आपल्या राजवाड्याची स्तुती करायचा त्याचा अहंकार उतरवण्यासाठी एक साधू त्याच्या राजवाड्याजवळ येतो व शिपायाला म्हणतो, ‘शिपाई महाराज, मला या धर्मशाळेमध्ये दोन दिवस राहण्यासाठी एखादी खोली मिळेल का?’ हे ऐकताच त्या शिपायाला खूप राग येतो व तो शिपाई त्या संन्याशाच्या अंगावर ओरडतो, ‘तुला ही धर्मशाळा वाटते काय?’ संन्यासी व शिपाई दोघेही एकमेकांशी जोरजोरात भांडणे करू लागतात. राजवाड्यामध्ये आवाज गेल्यानंतर, राजा त्या संन्याशाला बोलावून घेतो. त्या वेळेला शिपाई राजाला सांगतो, ‘महाराज आपल्या राजवाड्याला हा धर्मशाळा असे म्हणत आहे.’ हे वाक्य ऐकताच राजाही संन्याशावर खूप भडकतो व तो संन्याशाला विचारतो, ‘महाराज एवढ्या माझ्या ऐश्वर्य संपन्न राजवाड्याला तुम्ही धर्मशाळा का म्हणून म्हटलं? तुम्हाला ही धर्मशाळा वाटते का?’ राजाचे हे वाक्य ऐकताच तो संन्याशी राजाला म्हणाला, ‘महाराज, तुमच्या अगोदर या राजवाड्यात कोण राहत होता?’ त्यावेळेला राजा त्याला म्हणाला, ‘माझे वडील.’ उत्तर ऐकताच, संन्यासी राजाला म्हणाला, ‘त्यांच्या अगोदर कोण राहत होतं?’ महाराज म्हणाले, ‘माझे आजोबा’ उत्तर ऐकताच संन्यासी राजाला म्हणाला, ‘त्यांच्या अगोदर ?’ राजाने उत्तर दिले, ‘माझे पंजोबा’ संन्यासी राजाला म्हणाला, ‘मग ही लोकं आता कुठे आहेत? इथे राहतात का?’ त्या वेळेला राजा संन्याशाला म्हणाला, ‘या लोकांचा मृत्यू झाला आहे. जोवर त्यांचा आयुष्य होतं, तोवर तेथे राहत होते.’ त्यावेळेला तो संन्याशी राजाला म्हणाला, ‘महाराज जोपर्यंत आयुष्य आहे. ते संपलं की प्रत्येकाला इथून निघायचं आहे. प्रत्येक जण जेवढं जीवन आहे, तेवढाच काळ येथे घालवतो. तो गेल्यानंतर दुसरा इथं येतो. तो गेल्यानंतर तिसरा इथे येतो. म्हणजे आपला हा राजवाडा ही एक धर्मशाळाच आहे.
मित्रांनो, खरोखर आपण सर्वजण प्रवासी आहोत. या शरीररोपयोगी अतिथी गृहामध्ये आपल्याला काही काळ राहायचं आहे. आपला सूर्य जेव्हा मावळेल, तेव्हा आपल्याला इथून निघायचं आहे. जोपर्यंत निर्वाण मिळत नाही, तोपर्यंत आपला असाच विश्रामगृहाचा प्रवेश चालू असणार आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीशी आसक्त होऊ नका. निरासक्त होऊन जीवनाचा आनंद घ्या.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!