रमेश एका कंपनीत सेल्समन म्हणून कामाला लागला. तो नवीन असल्यामुळे कनिष्ठ लोकांबरोबर त्याची ओळख झाली. तो पहायचा ही लोकं कामावर आल्यानंतर एकमेकांबरोबर गप्पा मारायची, चहा प्यायची, याच्या-त्याच्या उचापत्या काढायची. नंतर कामाला लागायची. यात ती बराच वेळ घालवत असत. रमेशने या कंपनीमध्ये येऊन आपलं करिअर उज्वल करण्याचे ठरवलं होतं. त्यामुळे रमेशच्या गुरुजींनी त्याला एक सल्ला दिला होता, नेहमी आपल्यापेक्षा यशस्वी माणसाच्या संपर्कात राहायचं. म्हणून रमेश कामावर आल्यानंतर वरची लोकं, ज्यांचा सेल जास्त आहे, ती कशी वागतात? त्याचे निरीक्षण करायचा.
रमेशने वरच्या लोकांचे निरीक्षण करून त्यांच्यासारखे कपडे परिधान करणे चालू केल. त्यांच्यासारखं बोलणं, वेळेची बचत करणं चालू केलं. रमेशने ज्याचा सेल जास्त आहे अशा वरिष्ठ मित्राला भेटून याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्या वरिष्ठाच्या यशाच रहस्य विचारल. त्या जास्त सेल करणाऱ्या माणसाने रमेशला एक पुस्तक विकत घेऊन वाचायला सांगितलं व काही YouTube टॉक ऐकायला सांगितले. पुस्तक वाचल्यानंतर रमेशच्या ज्ञानात खूप भर पडली. विचारात पण खूप भर पडली. युट्युबवरचे प्रेरणादायी टॉक ऐकून त्याला खूप प्रेरणा मिळाली. व वरिष्ठ ज्या पद्धतीने काम करतात, त्या पद्धतीने त्याने कामाचे नियोजन करणे चालू केले. टॉप सेलर लोकांची मेथड वापरल्यामुळे त्याचाही सेल वाढला, तर तो ऑटोमॅटिक टॉप सेलरच्या यादीमध्ये आला. त्याला भरपूर पैसा मिळू लागला. टीमलीडर म्हणून त्याची नियुक्ती कंपनीने केली त्यांनी स्वतःचे घर घेतले व गाडी घेतली. सगळ्या गोष्टी मुबलक असल्यामुळे त्याला चांगली मुलगी मिळाली. त्याने लग्न केले. आज ऐश्वर्य संपन्न जीवन रमेश जगत आहे.
मित्रांनो, नेहमी आपण ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामधील आपल्यापेक्षा यशस्वी लोकांच्या संपर्कात राहा. ते जे करतात ते तुम्ही करा. लक्षात ठेवा पाच व्यसनी लोकांबरोबर तुम्ही एक वर्ष राहिलात तर सहावा व्यसनी तुम्ही असाल. पाच श्रीमंत लोकांबरोबर तुम्ही एक वर्ष राहिला तर सहावा श्रीमंत होण्याच्या मार्गावर तुम्ही असाल.
थोडक्यात तुम्ही ज्यांच्या बरोबर राहता तसे तुम्ही होता…
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
