मनात असते अमर्याद शक्ती…

२००१ सली गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यावेळेला दोन वर्ष सतत पॅरालिसिसने त्रस्त झालेला माणूस बेडवर पडून होता. परंतु जसा भूकंप झाला समोर बिल्डिंग पडायला लागल्या. झाडं उन्मळून पडायला लागली. काही लोकांची पळापळ त्याने पाहिली हे चित्र बघून तो कॉटवरून उठला आणि जोरात पळू लागला.
मित्रांनो, ही ताकद आली कुठून? जो मनुष्य दोन वर्ष कॉटवरून खाली उतरू शकत नव्हता, तो माणूस अचानक पळू कसा लागला?
दुसरी घटना काल्पनिक आहे. परंतु बोध घेणे महत्त्वाचं आहे. एका डबक्यामध्ये तीन बेडूक होते. त्यांनी डबक्यामधून नदीकडे जायचं ठरवलं. दोन बेडकांनी डबक्याच्या बाहेर जोरात उडी मारून ते बाहेर आले. परंतु तिसरा बेडूक त्याची उडी डबक्याच्या बाहेर जातच नव्हती. त्याने दोन-तीन वेळा प्रयत्न केला परंतु तो असफल झाला. त्याला लक्षात आले की, माझी उडी या डबक्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. माझं सामर्थ्य एवढेच आहे. तेवढ्यात एक भला मोठा नाग डबक्याच्या बाजूने त्याच्याजवळ आला. त्याने नागाला पाहताच इतकी जोरात उडी मारली की, ती डबक्यापासून खूप लांबवर पडली.
मित्रांनो, ज्या बेडकाला डबक्याच्या बाहेर उडी मारता येत नव्हती. तो एवढी लांब उडी कसा मारू शकला? अंतरमनात प्रचंड शक्ती असते ती जागवणं महत्त्वाचं असतं.
जुली कामावरून थकून भागून घरी आली होती. ती इतकी दमली होती की जेवण न करता झोपायचं असा तिचा विचार चालू होता. तिला काहीही सुचत नव्हते. तेवढ्यात तिच्या मित्राचा पार्टीसाठी फोन आला. ज्युली एकदम फ्रेश झाली. नवीन पार्टीचा ड्रेस घालून ती घरच्यांना सांगून एकदम उत्साहात पार्टीला निघाली. कामावरून आल्यानंतर संपूर्ण उत्साह गेलेल्या ज्युलीचा एकदम उत्साह आला कुठून?
मित्रांनो, मनामध्ये प्रचंड उत्साह, ताकद असते. मनासारखी गोष्ट असेल तर मन आनंदाने काम करायला तयार होते. मनाविरुद्ध करायला लावले की, ते रागराग करते. कधी मनासारखं व कधी मनाविरुद्ध अशा दोन्ही घटना आयुष्यात घडणार आहेत म्हणून आयुष्याचा समतोल राखण्यासाठी मनाला या दोन्ही घटनामध्ये समत्वांना ठेवण्यासाठी मनाला ध्यानाची जोड द्या. एकदा का होईना दहा दिवसाचे विपश्यनेचे शिबीर करा आणि मनाची शक्ती वाढवा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!