विचारे मना तूचि शोधूनी पाहे

 

निलेशला मित्राने बापू महाराजांची महती अनेक वेळा सांगितल्यामुळे एक साक्षात्कारी पुरूष म्हणून निलेश महाराजांचा निस्सीम भक्त झाला होता कामावरून सुटल्यानंतर महाराजांच्या मठाची स्वच्छता करणे, पाणी भरणे, बागकाम करणे, वेळप्रसंगी महाराजांचे पाय चेपणे, महाराजांना चहा व नाश्ता तयार करणे, कपडे धुणे, इस्त्री करणे अशी सेवा निलेश निःस्वार्थपणे करत होता. पगारातील बराचसा पैसा तो मठाच्या कामात खर्च करीत. महाराजांच्या सेवेने मुक्ती मिळेल या भ्रमात गेली ५ वर्षे हे कार्य अव्याहतपणे चालू होते. एक दिवस अचानक मठावर पोलिस आले व महाराजांना चौकशीसाठी घेऊन गेले. एका स्त्रीने विनयभंगाचा गुन्हा त्यांच्याविरूध्द दाखल केला होता. वर्तमानपत्रात महाराजांची बातमी वाचून अनेक स्त्रिया महाराजांनी त्यांच्यावर केलेले अत्याचार व लैंगिक शोषणाविरोधात पुढे आल्या. महाराजांना अनेक प्रकारची व्यसने असल्याचे उघड झाले. महाराजांना तुरूगांत टाकले गेले. निलेशला आपल्या तारूण्यातील ५ वर्षे फुकट गेल्याची व आपण फसलो गेल्याची जाणीव झाली. असे हजारो भक्तगण फसले होते.
ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे “सावध असावे – सर्वांविषयी” याचा भक्तांना विसर पडल्यामुळे अंधभक्ती उदयास आली होती. एक ससा आकाशातील ढगांच्या गडगडाटामुळे आकाश फाटले. आपण मरणार म्हणून पळू लागला. वाटेत भेटलेल्या कुत्र्याला पण आकाश फाटले, चल पळ म्हटल्यावर तोही सशाबरोबर पळायला लागला अशाप्रकारे सशाबरोबर कुत्रा-कोल्हा-वाघ-सिंह हत्ती सर्वच जीव खाऊन पळू लागले.
शेवटी एका माणसाने सगळ्यांना विचारले “का पळत आहात?” प्रत्येकजण आभाळ फाटले जीव वाचवण्यासाठी पळताहेत असे लक्षात आले हा पळतोय म्हणून मी पळतोय सगळेच अविचारांनी पळत सुटले होते. आभाळ तर सगळीकडे असणारच व कोसळणार असेल तर सगळेच त्याखाली सापडणार, मग का पळताय? त्या सर्व प्राण्यांची मनुष्याने अशी समजुत काढली. तेव्हा त्यांचा मुर्खपणा त्यांना कळून आला. मनुष्यप्राणी पण हेच करतो. त्याला आपल्या प्रज्ञेचा विसर पडतो व कोणीतरी सांगतो ही तीर्थयात्रा मुक्ती प्रदान करते, हजारो लोक ती तीर्थयात्रा करू लागतात. कोणीतरी म्हणतो अमुक अध्यायाने स्वर्गप्राप्ती होते. हजारो लोक अविचाराने त्याच अध्यायाची पारायणे करायला सुरू करतात. कोणीतरी सांगतो देवाला बकरे आवडते, मग देवापुढे हजारो प्राण्यांची कत्तल केली जाते. कोणी एखादा माणूस उदी भस्म घेण्यासाठी भगताकडे किंवा फकीराकडे जातो, हजारो माणसे त्या फकीराकडे रांगा लावतात. महाराजांना सिद्धी प्राप्त आहे, त्यांना सर्व कळते असे भक्त एकमेकांच्या कानात कुजबुजतात. तेथे हजारो लोकांची वर्दळ सुरू होऊन त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते. पण महाराजांनाच मुक्तीचा रस्ता माहित नसतो, आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून ?
एका धर्मोपदेशकाला एका आश्रमात प्रवचन द्यायला जायचं होतं. त्याने रस्त्यात एका लहान मुलाला आश्रमाचा रस्ता विचारला. त्या मुलाने तपशीलवार रस्त्याची माहिती सांगितल्यावर तो धमर्मोपदेशक त्याला म्हणाला
“आज रात्री तू सुद्धा ये बरं का बाळ आणि तुझ्या सगळ्या मित्रांना पण आण!”
“कशाला ?” पोरानं विचारलं.
“अरे, मी ना तुम्हाला स्वर्गात कसं जाता येईल याबदद्ल माहिती देईन.”
त्यावर तो सुज्ञ मुलगा हसत हसत त्या धमर्मोपदेशकाला म्हणाला “माझी फिरकी घेऊ नका हं तुम्ही. तुम्हाला साधे आश्रमामध्ये कसं जायचं ते माहीत नाही अन म्हणे स्वर्गात कसं जायचं ते सांगतो.”
विवेकानंद म्हणतात “मृत्युनंतर स्वर्ग मिळेल तेथे खूप आनंद-मजा असते म्हणून स्वर्गात जाण्यासाठी आयुष्य घालवण्यापेक्षा जिथे आहात त्या ठिकाणीच स्वर्ग तयार करा. या पृथ्वीतलावरच स्वर्ग निर्माण करूया. शेवटी भगवान बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे आपली प्रज्ञा जागृत करा. स्वतःच स्वतःचे दीप व्हा. मी म्हणतो, धर्मग्रंथ सांगतो, पिढ्यानपिढ्या चालत आले म्हणून, धर्मगुरू म्हणतो म्हणून ते सत्य मानू नका, तुमच्या अनुभूतीवर जे उतरते तेच तुमच्यासाठी अंतिम सत्य. ते तुमच्या आतच आहे. तुम्हीच तुमचे गुरू व्हा.
अत्त दीप भव -अत्त दीप भव. “शोधीसी मानवा – राउळी -मंदिरी।
नांदतो देव हा आपल्या अंतरी।”

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!