घर असावे घरासारखे

 

रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस, जरा निवांतच सोफ्यावर बसून पेपर वाचताना रेडिओवरील एक धुन कानावर पडली “घराला घरपण देणारी माणसं छान छान घरात राहतात माणसं”. मला लहानपणचे आमचे एकत्र कुटूंब आठवले. आई-वडिल-भाऊ-बहिणी- नातलग खूप मज्जाच मज्जा. खूप मनसोक्त हसणं, खेळणं, बागडणं, रूसणं-फुगणं लगेच माफ करणं, काळजी घेणं, आपलेपणा, खूप आनंदात जगणं होतं ते. त्या भावविश्वात जाताना माझ्या घराच्या भिंतीवरील ती कविता
“घर असावे – घरासारखे -नकोत नुसत्या भिंती
परस्परांवर प्रेम असावे -नकोत नुसती नाती”
डोळ्यासमोरून तरळून गेली. पुर्वी लहान गावात भरलेली घरे होती. मिळकत कमी होती. गरजा कमी होत्या पण माणसं घरात प्रत्यक्षात एकमेकांच्या सहवासात रमत होती. पण कालांतराने घरातील लोक उद्योगधंद्यासाठी – उपजिविकेसाठी घर सोडून दूर गेली. पर्यायाने एकत्र कुटुंबपध्दती संपुष्टात आली. आता तर माणूस सकाळी बाहेर पडला की रात्री उशीरा घरी आला की जेवण करून झोपतो, इथपर्यंतच त्याला घराचा सहवास लाभतो.
एकत्र कुटूंबात अडीअडचणीला एकमेकांच्या मदतीसाठी माणसे असतात. आजार, अपघात, संकट अशा प्रसंगी हीच माणसे गरजेची असतात. पूर्वी भरल्या घरात सगळ्या गोष्टी निभावून नेता येत असत. आता लहान घरकुलावर कधी कधी संकटाच्या वेळी आभाळच कोसळते संयुक्त कुटुंब ही संस्काराची पाठशाळा होती सर्व वयोगटातील माणसे तेथे असत मुलांचे समाजीकरण व मूल्यशिक्षण तेथे सुलभतेने घडत असे घर नावाचं एक लहानसं जग मोठं आनंददायी होतं. आता हे जग विखुरलं गेलं आहे तरी पण सणासुदीला व यात्रेला एकत्र येऊन भरलेल्या घरात आनंदोत्सव साजरा करताना मन उल्हासित होत असते माणूस संपूर्ण दिवस बाहेर असला तरी सायंकाळी त्याचे पाय घराकडेच वळतात.
शहरात आता घरे लहान झाली. उद्योगासाठी दिवसभर बाहेरच रहावे लागते घरात असते तरी कोण? ज्याला पाणी नसते तो नळ, दिलेल्या सुचना परतावणारा फोन, पाली आणि झुरळे.
घरातील लहान मुले, पाळणाघरात किंवा संस्कार केंद्रात ठेवली जातात शिक्षणप्रसारामुळे, नोकरीच्या आकर्षणामुळे, समाजकार्याच्या ओढीमुळे “गृहिणी” हे पद पण अंशकालीक झाले आहे. गृहस्थ व गृहीणी घरात कधी एकमेकांना भेटतील हे सांगणे आज अवघड झाले आहे काळानुसार सगळं बदलत राहणारच पण त्यातूनही काही चांगलं करण्यास वाव असतो त्यासाठी कौटुंबिक इच्छाशक्ती हवी. झाडाच्या सर्व फांद्या बुंध्याशी एकटवतात तसे घराण्याच्या व घराच्या सर्व पसरलेल्या शाखा एकवटणे शक्य आहे वर्षातून तीन/चार दिवस सर्वांनी सुट्या काढून एकत्र यावे वयोवृध्दांचे वाढदिवस साजरे करावेत. नवविवाहितांना काही भेटी द्याव्यात. मुलांना खाऊ वाटावा. शेवटी घरातच आपण सर्व भावंड लहानाचे मोठे झालेलो असतो. आपला सर्वांगीण विकास हा घरातच झालेला असतो. आदर, सत्कार, भांडणे, रूसवे, फुगवे, वाढदिवस, पार्ट्या, सगळया जिवंत आठवणी घरातच घडलेल्या असतात. याच घराच्या वाटणीसाठी भावडांमध्ये झालेल्या मारामाऱ्या, कोर्टकचेऱ्या पाहून ज्याने हे घर बांधले त्या पित्याच्या आत्म्याला दुःख होत असेल याचा सारासार विचार घरातील मंडळींनी करणे गरजेचे असते. अन्यथा जीवनात घरघर चालू होते.
परमहंस रामचंद्रदासांनी मठालाच आपलं घर मानलं होतं. आजाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी स्वतःला मठात नेण्याची इच्छा व्यक्त केली. जगाचा निरोप घेताना आपल्या मूळस्थानी पोहचावे असा त्यांचा भाव होता.
जे कृष्णमूर्ती कॅन्सरला तोंड देत देत ज्या वेळेस उपचाराच्या पैलतीरावर गेले त्यावेळेस निकटवर्ती अभ्यासकांना म्हणाले हा देह माझ्या कुटीकडे घेऊन चला मराठी तत्वशाळा महाकोशाचे रचनाकार प्राध्यापक देविदास वाडेकर यांनी आपल्या अखरेच्या आजारात “मला घरी घेऊन चला” एवढाच आग्रह धरला.
माणूस नावाच्या प्राण्याला पूर्वी घर हे एक सुखद, सुरक्षित, प्रेममय, आधारयुक्त असे स्थान वाटत होते. एकत्र कुटुंबातील घरातील लोक एकमेकांवर खूप प्रेम करत असत. आज घरे विभक्त झाली आहेत. घरच्या लोकांचा कंटाळा व बाहेरच्या लोकांबरोबर विरंगुळा अशी समाजरीत वाढली आहे. प्रेमाची धारा, सुसंवाद दिवसेंदिवस बोथट होत चालला आहे. मनुष्याने आत्मकेंद्रीपणा कमी करून थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त आणली, तर सर्व आवडीच्या गोष्टी व व्यक्ती यांच्याशी आनंदाने सुसंवाद साधता येतो. हे तारतम्य सुटले, एकमेकांकडे दुर्लक्ष केले, जो तो आपल्याच नादात राहिला तर मात्र भरल्या घरात रितेपणा येऊन अशांतीचा शिरकाव होऊ लागतो. त्यावेळेस प्रत्येकाने आपल्या आवडीनिवडी, क्षमता, स्वभाव विचारात घेऊन, एकमेकांच्या मर्यादा ओळखून, एकमेकांच्या अविष्काराच्या पध्दती जाणून एकमेकांचे अस्तित्व व अस्मिता सांभाळणाऱ्याचं घर सुखी होते. अशा घराचे अंगण सुंदर असते. त्या भोवतालचं जगही त्याला प्रतिसाद देते. स्त्रीला स्वयंपाकघर आवडते, पुरूषांना पुढची खोली, मुलांना नजरेआड असलेले स्टडी रूम आवडते. खरोखर घराला स्वर्ग बनवायचा असेल तर एकमेकांवर निःस्वार्थपणे प्रेमाची उधळण करा. त्यासाठी त्यागाची समर्पणाची भावना ठेवा. मनाची शुद्धता, प्रेम, करूणा, मैत्रीचा घरातील लोकांवर वर्षाव करा. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वासाठी पसायदान म्हटले आणि “हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना उदयास आणली.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!