कार्यशाळेत खिशातून रुमाल काढून ऑडीयन्सना प्रश्न विचारला, या रुमालाचे उपयोग सांगा. उत्तरं आली हात पुसणे, नाक पुसणे, प्रदुषण टाळण्यासाठी नाकावर
बांधणे, उन्हात डोक्यावर घेणे.
मी त्यांच्यासमोरच त्या रुमालाला २ गाठी मारल्या व विचारले सांगा मित्रांनो आता या रूमालाने नाक पुसता येईल का? हात पुसता येईल का? उन्हात डोक्यावर, प्रदूषणात नाकावर बांधता येईल का? तर उत्तर नाही असे होते. जोपर्यंत रूमाल खुला होता त्याचे असंख्य उपयोग होते परंतु ज्यावेळेस त्याला गाठी मारल्या त्याचे उपयोग संपले.
मानवी मनाचे असेच आहे. जोपर्यंत ते खुले, मोकळे आहे त्याचे करोडो उपयोग आहेत पण ज्यावेळेस या मनाला गाठ मारताल मग ती द्वेषाची, वासनेची, मत्सराची, अहंकारांची, लोभाची कुठलीही असो मनाचे उपयोग कमी होऊन ते निरुपयोगी होते. निरुपयोगी मन नैराश्याकडे जाते. म्हणून मनाला गाठ मारु नका, ते मोकळे व खुले ठेवा. जसं पॅराशुट उघडलं तरच ते उपयोगी असतं. पॅराशुट उघडलं गेलं नाही तर अंत हा ठरलेला म्हणून मनाला गाठी मारणे थांबवा. मोकळे व्हा.
त्यासाठी मनाला ध्यानाची व सकारात्मक विचारांची जोड द्या.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
