राजा आपल्या लवाजम्यासह चालला असताना एक इसम समोरून आला. राजाची व त्याची नजर भिडली, त्वरित राजाने त्यांच्याकडे बोट दाखवून क्रोधाने, पकडा, मारा व जेलमध्ये टाका अशी सैनिकांना आज्ञा केली. राजाज्ञा होताच सैनिकांनी त्याला पकडून मारत मारत तुरुंगात टाकले.
दुसऱ्या दिवशी प्रधानाने राजाला त्या इसमाला तुरुंगात टाकण्याचे कारण विचारले, तेव्हा राजाला याचे कारण काहीच सांगता येईना. राजा म्हणाला, प्रधानजी, काय कळलं नाही पण तो समोर दिसला आणि मला खूप राग आला. क्रोधीत अवस्थेत मी भान हरपल्यामुळे त्याला पकडा, मारा, आत टाका असे म्हणालो. यावर तुम्हीच काय तो निर्णय त्याच्याबाबतीत घ्या.
आध्यात्मिक वृत्तीच्या प्रधानाने तुरुंगात जाऊन त्या माणसाची चौकशी सुरू केली. तेव्हा तो माणूस प्रधानाच्या प्रश्नांना उत्तर देत म्हणाला. साहेब राजाने मला मारायला व तुरुंगात टाकायला का सांगितलं माहीत नाही. पण माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज आहे.
माझ्याकडे तिच्या लग्नकार्यासाठी पैसे नाहीत. पण चंदनाची लाकडे आहेत. पण ही लाकडे कोण विकत घेणार? हा विचार चालू असताना राजा लवाजाम्यासाह समोरून येताना दिसला व चटकन माझ्या मनात विचार आला, हा राजा जर मेला तर माझी चंदनाची लाकडे खपतील. कारण राजाला चंदनाची चिता रचावी लागते. तेवढ्याच राजाने आज्ञा केली व मला सैनिकांनी मारत-तुरुंगात टाकलं.
प्रधानाला अज्ञात गोष्टीचा उलगडा झाला. त्या माणसाच्या राजाविषयीच्या नकारात्मक व हानीकारक विचारांनी राजाला आतून अस्वस्थता व बेचैनी निर्माण झाली. म्हणून राजाने पकड़ा-मारा-आत टाका ही आज्ञा केली खरोखर आपण समोरच्या माणसाविषयी मनात करत असलेल्या विचारांचा पण त्याच्यावर परिणाम होतो. म्हणून मन एखाद्याविषयी वाईट विचार करू लागले, कि त्याला विचारा- एक क्या बोलता तू? व सावध व्हा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
