एकाच वर्षांत वृषालीच्या व्यक्तीमत्वात खूपच बदल दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर तेज, व्यायामामुळे घडलेली स्लीम शरीरयष्टी, उत्पन्नात झालेली वाढ, नातेसंबंधात सुधारणा, व चेहऱ्यावरचा आनंद, मनाने पण ती शांत झाली होती तिचा शारिरीक, मानसिक, आर्थिक, भौतिक व अध्यात्मिक हा चढता आलेख पाहून मी तिला याचं रहस्य विचारलं.
तिने सांगितलं, मी स्वतःवर खूप प्रेम करते. रोज व्यायाम व ध्यान करते. आहार-विहार यात समतोल साधते. आवडता छंद जोपासते. कुटुंबाला वेळ देते. स्मार्ट वर्क करते. वेळेचे नियोजन करते.
मी माझी निंदा करणाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करते. मी घरात व नातेवाईकांबरोबर वाद घालत बसत नाही. मी कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवत नाही. नवऱ्याला व मुलांना त्यांची स्पेस देते. माझ्या हक्कासाठी देखील मुर्ख लोकांशी मी भांडणे करत बसत नाही. विवेकाने प्रश्न सोडवते. मी माझे ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःशीच लढा देते.
दुसऱ्यांशी व मुर्ख लोकांशी फाईट करण्यापेक्षा स्वतःबरोबर फाईट करून माझ्या स्वप्नांचा, ध्येयाचा सतत पाठपुरावा करते व त्यासाठी सर्वांशी प्रेमाने वागते. हेच माझ्या यशाचे रहस्य.
मित्रांनो, मुर्खाशी वाद घालत बसण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा व ध्येयवेडे व्हा. ध्येयवेडी माणसेच क्रांती करतात व स्वतःला शहाणे म्हणवून घेणारे त्यांचा इतिहास वाचतात.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
