वडिलांच्या आग्रहाखातर व लहानपणापासून ऐकलेली बुवा महाराजांची वाणी यांच्या प्रभावाने संजय ने मठात ब्रह्मचर्यव्रताची दिक्षा घेतली. मुक्ती हेच जीवनाचं अंतिम सत्य या विचारांनी संजय भारावून गेला होता तारुण्यातील सर्व नैसर्गिक भावभानांचं संजय जबरदस्तीने दमन करत होता.
अशातच राजबिंडा, हुशार अध्यात्मिक संजयच्या जीवनात एक लावण्यवती साधिका आली व शेवटी व्हायचं तेच झालं. दमनवृत्तीच्या संजयला निसर्गाने हरवलं. परिणामी त्याचा पाय घसरला व्यभिचार हे महापाप आहे, व्यभिचार करणाऱ्याला नरकात जायला लागते. ब्रह्मचर्य नाश म्हणजे मृत्यू. अशा अनेक उपदेशांनी युक्त संजय या सर्व गोष्टी मनातच लपवल्याने नैराश्यात गेला.
स्ट्रेस मॅनेजमेट च्या कार्यशाळा मी घेतो हे त्याने फेसबुक वर वाचले व मला फोन केला. फोनवर मी त्याला पूर्णतः बोलून मोकळे केले व अपराधीपणाच्या मनात घर करून बसलेल्या त्याच्या विचारांना दूर सारले. व परत अशी चूक होणार नाही याची काळजी घे. अन्यथा झेपत नसेल तर गृहस्थाश्रमात येण्याचा सल्ला दिला.
मित्रांनो मनात अपराधीपणाची भावना ठेवून जगू नका. समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली व शिट्टी दाबूनच ठेवली तर त्याचे काय होईल? अर्थात स्फोटच.
डबक्यातला पाण्याला वाहण्याचा मार्ग बंद केला तर ते पाणी आतल्या आत रापून त्याला दुर्गंधी सुटेन. मानवी मनाचं असंच असतं. भावनांना वाट मिळाली नाही. विचारांची देवाणघेवाण झाली नाही कि मनात विकृती निर्माण होऊन डिप्रेशन येते. म्हणून संवाद हा अत्यंत आवश्यक असतो तो मनाचा आहार आहे. संवादामुळे मन मोकळे व हलके होते. विचारांच्या देवाणघेवाणीमुळे विचारांना नवा आयाम मिळतो. आपलं मानसिक संतुलन चांगले राहतं. थोडक्यात कुकरची शिट्टी दाबू नका. आवश्यक त्या वेळी बिनधास्त व्यक्त व्हा. संपन्न व्यक्तीमत्त्वासाठी निरोगी मनासाठी संवाद आवश्यक असतो. तेव्हा मोकळे होण्यासाठी तुम्ही स्वमनाला एवढंच सांगा, “बोल ना माही बोल ना.”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
