८४ वर्षे वयोमान असलेल्या माझ्या वडिलांना पाय घसरून पडल्याने जागेवरून उठताच येत नव्हते. गला ही वार्ता कळताच मी घरी पोहचलो आणि वडिलांना त्वरित हॉस्पीटलमध्ये घेऊन गेलो तपासण्यानंतर ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. आम्ही होकार दिला. १ महिन। वडील हॉस्पीटलमध्ये होते. डिस्चार्ज घेऊन घरी आणल्यानंतर वडिलांनी धीर सोडला. मन कमकुवत केले व बरे होण्याची आशा सोडून ते व्याकुळतेच्या विचारचक्रात फिरू लागले. जेवण वर्ज्य, नुसते पडून रहात व आमच्याकडे पाहत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नळीवाटे इन्टेक फुड चालू केले. पण स्वतःच्या इच्छाशक्तीवर सर्व अवलंबून असते वडिलांनी खूपच धसका घेतला. त्यांना उच्चरक्तदाबामुळे वारंवार अस्वस्थता येई, पुढे घराचे, मुलांचे कसे होणार या विचारांनी त्यांना नैराश्य आले. वडिलांची सर्व बाजूने खूप सेवा आम्ही करत होतो. अचानक एके दिवशी फॅमिली डॉक्टरांचा फोन आला. त्वरित घरी या, वडील सिरीयस आहेत. घरी आलो तर काय घरासमोर गर्दी जमली होती. वडिलांनी अखेरचा श्वास घेतला होता. अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली, नातेवाईक जमा झाले.
थोरला मुलगा या नात्याने रितीरिवाजानुसार अंत्ययात्रेच्या पुढे डोक्यावर कंबळ म्हणजे घोंगडी व हातात तिरडीतील माठात जळता निखारा घेऊन नातलगांबरोबर चालू लागलो. एका जवळच्या मित्राने, डावा हात प्रेमाने पकडला होता. ‘राम-नाम-सत्य है।’ चा नारा चालू झाला. दुःखी अंतकरणाचा बांध फुटला – डोळयांतून आसवे बाहेर पडू लागली. मनात भयानक खिन्नता, व्याकुळता आली वडिलांच्या जाण्याच्या दू:खाने अंगातील त्राण गेले होते. अशातच भजनी मंडळीची टाळ, पखवाज वाजवता वाजवता वाणी दुमदुमली,
“आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा
आजवर होतो आपल्या गावी, आता कृपा असू द्यावी
आता नाही येणे-जाणे, सहज बोलणे खुंटले ॥”
या ओळींनी ऊर भरून आला. वडिलांच्या आठवणीचा चित्रपट डोळयांसमोरून सरकू लागला गळून गेल्यासारखे वाटलं अश्रुंचा बांध फुटला, मन विरह मान्य करायला राजी नव्हते. तेवढ्यात गौतम बुध्दांची गोष्ट आठवली. किसा गौतमी नावाच्या स्त्रीला फारच उशीरा मूल झाले होते. हा मुलगा ७ वर्षांचा असतानाच त्याचा सर्प दंशानी मृत्यू झाला किसा गौतमी मात्र या मुलाचा मृत्यू झाला हे स्विकारूच शकत नव्हती. जिवापेक्षा जास्त प्रेमाने वाढविलेल्या मृत मुलाला ती छातीशी लावून म्हणत होती, “अरे हा तर झोपलेला आहे.” त्याला उठवायचा प्रयत्न करून देखील तो हलेनाच हे पाहून तिच्या मनाचा समतोल गेला. ती वेड्यासारखं “या मुलाला उठवां रे” म्हणून ओरडू लागली. जमिनीवर लोळू लागली. शेवटी नातेवाईकांनी तिला बुध्दांच्या समोर आणून उभी केली, ती बुध्दांच्या पायावर डोकं टेकवून “भगवान माझ्या मुलाला जिवंत करा” म्हणून विनवणी करू लागली. बुध्दांनी तिची मानसिकता जाणून तिला गावातून एक चिमुटभर मोहरी आणावयास सांगितली पण ती चिमुटभर मोहरी अशाच घरातून आणावयाची होती. की ज्या घरात कोणाचाही मृत्यू झाला नाही. दिवसभर गावभर घराघरात फिरली पण असे एकही घर सापडले नाही की ज्या घरात कोणाचाही मृत्यू झाला नाही. कुणाचे आजोबा, कुणाची आजी, कुणाच्या वडिलांचा मृत्यू हा झालेलाच होता. अनुभवाच्या आधारावर भानावर आली. भगवान बुद्धांनी समजावून सांगितल्यावर “वियोग” हा आयुष्याचा एक भाग आहे हे तिने स्वीकारले व साधनामार्गात रममाण झाली. प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचेच आहे. “जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी, मौत मेहबुबा है अपनी साथ लेकर जायेगी ।” या गाण्याचा प्रत्यय आला.
मित्रांनो या मृत्यूविषयी तुकाराम महाराज म्हणतात “जे नाव करून नाही मेले – ते नुसते आले आणि गेले” मृत्यू म्हणजे फक्त देहाचा बदल रवीद्रनाथ टागोर म्हणायचे जशी आई बाळाला दूध पाजताना कुस बदलते तसाच जन्माचा बदल म्हणजे मृत्यू.
मौलाना जलालउद्दीन रूमी म्हणतो “मी मरणाला का भ्यावे ? त्याने माझे काय नुकसान व्हावे ?”
म्हणून मृत्यू हा अटळ आहे जो जन्मतो तो एक ना एक दिवस मरतोच. संत कबीरांच्या सांगण्यानुसार “कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोये। ऐसी करनी करलो भाई जब हम गए जग रोये – हम हँसे।।” माझा जन्म झाला त्यावेळेला जग हसत होते. मी रडत होतो, असे कार्य करूया कि मृत्यूनंतर जग रडेन व मी हसत-हसत अलविदा म्हणेन चला मग हसत हसत मृत्यूला सामोरे जाण्यासाठी सत्कर्माची कास धरूया व मृत्यूनंतर ‘किर्ती रूपी उरूया.’
त्यासाठी मनात करूणा व मैत्री वाढवा. दुसऱ्यांना मदत करा. शिवभावे जीवसेवा करा. भुकेलेल्याला अन्न-तहानलेल्याला पाणी द्या. निरक्षराला साक्षर करा. आजाऱ्याला वैद्यकीय मदत करा. निराधाराला आधार द्या व प्राणीमात्रांवर भरभरून प्रेम करा. हत्या, चोरी, व्यभिचार, व्यसनापासून दूर रहा व माणसाशी माणसाप्रमाणे वागा.
भगवान बुद्धांना भक्तांनी विचारलं, भगवान आमच्या वाईट वेळेला आमच्या मदतीला कोण येईल ? आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले भगवान म्हणाले. यातील कोणीही नाही मग कोण ? भगवान म्हणाले, “तुम्ही केलेले पुण्य हेच तुमच्या कामाला येईल”. म्हणून आपले जीवन आपल्या कुटूंबाबरोबर, समाजासाठीही अर्पण करा व मृत्यूनंतर पण किर्तीरुपाने मागे नावरूपी उरा. म्हणतांत ना
“मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है।
जीना उसका जीना है, जो औरो को जीवन देता है ।”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
