अकड किस बात कि प्यारे ?

 

अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची घटना, रस्त्याच्या कडेने जात असताना लष्कराची एक गाडी अडचणीच्या जागेत अडकली. आतील शिपाई उत्तरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्यावरचा अंमलदार मात्र फक्त हुकूम देत जोराने ओरडत होता. त्यानेही थोडी मदत केली तर गाडी लगेच निघण्याचा संभव होता पण तो होता साहेब ! फक्त हुकूम देत उभे राहणे व खेकसनेच त्याने पसंद केले होते. तेवढ्यात मागून एक गाडी आली. त्या गाडीतून एक सज्जन गृहस्थ उतरला. त्याने लगेच सैनिकांच्या बरोबरीने गाडीला हातभार लावून ती गाडी अडचणीतून बाहेर काढली.
दुसऱ्या गाडीतून आलेला तो सज्जन गृहस्थ त्या अंमलदार साहेबाला म्हणाला “पुन्हा गरज पडली तर मला बोलवत जा.” अंमलदाराने त्याची पाठ थोपटत त्याला नाव विचारले. तेवढयात त्या सज्जन गृहस्थाने आपल्या खिशातून आपले ‘व्हिझीटींग कार्ड’ त्या अंमलदाराला दिले. त्याने ते सहजच वाचले व त्याला दरदरून घाम फुटला. कारण मदतीला आलेला तो गृहस्थ अमेरिकेचा सर्वेसर्वा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होता. सत्कृत्यासाठी पुढे येताना आपले पद व प्रतिष्ठा बाजूला ठेवावी हे त्याने वागण्यातून दाखवून दिले होते.
खरोखर माणसातील नम्रता व करूणाच त्याला मोठे करत असते. म्हणून अहंकार नष्ट करून मानवतेचा स्वीकार करणे ही खरी साधना होय. नम्रता हा सद्गुणी माणसाचा दागिना आहे. जसजशी मनुष्याची प्रगती होते तसतसा अहंकाराचा दर्प त्याच्या अंर्तमनाला लागण्याची दाट शक्यता तसतसा या अहंकाराला तिलांजली देण्यासाठी, प्रत्येकाला एक का होईना कल्याणमित्र किंवा गुरू असावा लागतो.
एका राजाचे शेकडो सैनिक त्याच्यासमोर कामात मग्न असतात. सहजपणे राजाच्या सुप्तमनात या शेकडो सैनिकांना मी पोसतोय असा विचार मनात डोकावला. त्याच क्षणी शेजारी बसलेल्या त्याच्या गुरूने राजाला समोरच असलेली एक विशाल शिळा म्हणजे मोठा दगड त्याच्या सैनिकांच्या सहाय्याने हलवण्यास सांगितले. सैनिकांनी शिळेला जोर लावून ती ढकलताना तिच्या खालून एक भला मोठा बेडूक उडी मारत बाहेर पडला. त्याचक्षणी गुरू राजाला म्हणाले. “या दगडाखाली असलेल्या एवढ्याशा जीवाचा, बेडकाचा पण तूच पोशिदा आहेस का ?” राजाला आपली चूक लक्षात आली व त्याने गुरूंची क्षमा मागितली. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
सिकंदरने जग जिंकले होते. पण त्याने मृत्यूपत्रात माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे पसरवून माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता. सिकंदरला समग्र मानवजातीला हेच सांगायचे होते की मी सिकंदर जगविजेता खाली हात आलो आणि खाली हात गेलो. म्हणून नम्रता अंगी बाळगू या.

बोरकरांच्या कवितेतील सुंदर ओळी सांगतात-
“पक्व फळापरी मी पण ज्यांचे आपोआप गळले रे
जीवन त्यांना कळले रे, जीवन त्यांना कळले रे ।”
एका मुस्लीम संताने देखील म्हटले आहे,
“झुकना तो ज्ञानी की शान है,
अकडना मुर्दे की पहचान है।”
ज्ञानवंत हे नेहमी नम्र असतात. शेवटी एवढंच सांगावसं वाटतं,
“जिसके मन से प्रज्ञा जगी, होय विनम्र विनित ।
जिस डाली को फल लगे, झुकने की है रीत ।।”
फळं लागलेली फांदी नेहमी वाकलेली असते.

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!