संघ

 

एका फळविक्रेत्याकडे थांबलो होतो. मी विचारले, “आज काय भाव आहे द्राक्षांचा…?” तो म्हणाला “साठ रू. किलो” जवळच, सुट्टी द्राक्षे ठेवली होती मी त्याला म्हणालो “यांचा काय भाव आहे”? तो म्हणाला “पंचवीस रूपये किलो” मी त्याला विचारले यांचा भाव साठ रूपये व यांचा भाव २५ रूपये इतका कमी असे का? तो म्हणाला साहेब दोन्हीही द्राक्ष एकाच बागेतली आहेत. दोन्हीही गोड व चांगलीच आहेत. पण ही घडात एकसंघ असल्याने साठ रूपये व ही घडातून तुटून एकेक झाल्याने २५ रूपये. मी समजून गेलो. जोपर्यंत आपण एकसंघ आहोत तोपर्यंत आपली किंमत ही उच्चतम असते. ज्याक्षणी आपण संघातून विलग होऊन एकटे होतो तेव्हा आपली किंमत खूप खाली आलेली असते.
म्हणून कुटूंबात – नातेवाईकांत, संघात राहण्यासाठी आपली धडपड चालू असते. या पृथ्वीतलावर एकटा माणूस फार मोठे काम करू शकत नाही. त्यासाठी संघाचीच गरज असते. अमेरिकेत विवेकानंद दोन लाख श्रोत्यांसमोर म्हणाले, “आज मी एकीच्या प्रेमात पडलोय.” सगळी सभा अवाक झाली, विचार करू लागली अशी कोण लावण्यवती, नशीबवान युवती आहे जिच्या प्रेमात हा राजबिंडा योगी पडला आहे ? विवेकानंद सर्वत्र कटाक्ष टाकत म्हणाले, “जिच्या प्रेमात मी पडलो ती म्हणजे दुसरी- तिसरी कोणीही नसून ती म्हणजे संघटना होय, टीम होय.” विवेकानंदांनी देखील संघभावनेचे महत्व पटवून दिले होते.

भगवान बुद्ध देखील म्हणतात, “संघम् शरणम् गच्छामि !”

पानिपतच्या युध्दात अहमदशाह अब्दाली रणनिती, युद्धकौशल्याची आखणी करत असताना नदीच्या पैलतीरावरून पलीकडच्या काठावरील मराठ्यांच्या छावणीची पाहणी करत होता. त्यावेळी मराठ्यांच्या छावणीत आगोजागी चुली पेटलेल्या त्याला दूरवरून दिसल्या. मराठ्यांचे सैन्य नेमके किती याची विचारणा त्याने गुप्तहेरांशी केली तेव्हा त्याने हुजुर मराठ्यांचं सैन्य फारस नाही. तेथील प्रत्येक सैनिकाने आपल्या स्वयंपाकासाठी स्वतंत्र चुल पेटवली आहे. त्यावेळेस चुटकी वाजवून अब्दाली म्हणाला, “आपण शंभर टक्के युद्ध जिंकणार कारण जे सैनिक अन्न शिजवताना पण एकत्र येत नाहीत ते राष्ट्रासाठी एकदिलानं कसे लढतील?” पानिपतचा, इतिहास आपणास माहीतच आहे. म्हणून संघाने एकत्र येणे ही आवश्यक गोष्ट आहे. संघात लोक वेगवेगळया विचारांचे असतात, म्हणतात ना, “व्यक्ती तितक्या प्रवृत्ती” त्यांना एकत्र बांधून ठेवणे हे नेत्याचे कौशल्य असते.
भगवान बुद्ध म्हणतात, “एकमेकांना समजुन घेणारा, एकमेकांवर प्रेम करणारा, एकमेकांना पडत्या काळात साथ देणारा, एकमेकांचे हित चिंतणारा, एकमेकांची प्रगती करणारा, एकमेकांचा आदर करणारा असा संघ नेहमी पुढे जातो म्हणून संघभावना टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या अहंकाराला तिलांजली देणे आवश्यक आहे. बऱ्याचशा सुशिक्षित बांधवांमध्ये अहंकाररूपी राक्षस मधेमधे डोके वर काढत असतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “सुशिक्षित लोकांना एकत्र आणणे म्हणजे बेडकांचे तराजूत वजन करण्यासारखे आहे. एक तराजूत टाकताना दुसरा झटकन उडी मारून बाहेर पडतो म्हणून संघ तयार करून सर्वांनी एकविचारांनी एकत्र राहणे आवश्यक असते. यासाठी नेता हा देखील निःस्वार्थी व लोकप्रिय असावा लागतो. नेपोलियनचे सैनिक त्याने दिलेला आदेश तंतोतंत पाळायचे. त्यावर कोणीही प्रतिप्रश्न किंवा शंका घेत नसत. नेपोलियनचे यश यातच दडलेले होते. शेवटी एकता व आज्ञाधारकता एकत्र आली व संघभावना वाढीस लागली की यशाची दारे उघडणे सोपे जाते. शेवटी संघ टिकवण्यासाठी त्याग व निःस्वार्थता अंगीकारून खालील गीत आत्मसात करूया ।

“एक दुसरे से – करते है प्यार हम, एक दुसरे के लिए – बेकरार हम,
एक- दुसरे के वास्ते मरना पडे तो, है तैयार हम – है तैयार हम ।”

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!