२० वर्षे नामांकित कारखान्याच्या नगर रोडच्या विभागामध्ये कामाला जात होतो. कारखान्यापासून १ कि.मी. अंतरावर घर, सर्व दिनचर्या, छान चालली होती. विभागामधील कर्मचाऱ्यांची मुख्य विभागामध्ये बदली करणार आहे अशी कुणकूण कानावर आली होती. एके दिवशी फॅक्टरी मॅनेजर आले व म्हणाले तुम्हा कर्मचाऱ्यांची काही कारणास्तव कोथरूडच्या मुख्य विभागामध्ये बदली करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. ही बदली टप्याटप्याने करण्यात येणार आहे असे आम्हा कर्मचाऱ्यांना सांगितले. माझ्या मनामध्ये गोंधळ उडाला, अनेक प्रकारच्या विचारांचे काहूर माजले. एकाच तासात अनेक परिचित अधिकाऱ्यांना फोन करून एकच प्रश्न विचारत होतो. बदली सगळ्यांचीच करणार का ? मन उदास झाले होते. बदली स्विकारणं त्याला मान्य नव्हते. अधिकाऱ्यांच्या उत्तराची वाट पाहताना माझं मन फारच घाई गडबड करत होतं. मनातील विचारांकडे साक्षीभावानं पाहताना ओठातून एक गाणं बाहेर पडलं, “ये बेकरारी क्यू हो रही है। ये जानता ही नही … दिल है के मानता नही.” गौतम बुद्ध म्हटल्याप्रमाणे प्रिय स्थितीचा वियोग हे दुःखाचे कारण अनुभूतीवर उतरले.
खरोखर मित्रांनो मनाला व शरीराला एका विशिष्ट गोष्टीची सवय झाली कि त्याचा त्याग करणं व बदलाला स्विकारणं त्याला मान्य नसतं. अमेरिकेत २० वर्षांच्या एका तरूणाला खुनाच्या आरोपातून ५० वर्षांची शिक्षा लागली होती. परंतु त्याचे तुरूंगातील वर्तन इतके चांगले होते कि त्याची निम्मी शिक्षा माफ करून २५ वर्षानंतर त्याला सोडून देण्यात आले. तो बाहेर पडला त्यावेळचे जग वेगळे होते. भाषा बदलली होती. परिवारातील कोणीही उरले नव्हते. आई-वडिलांचा मृत्यू झाला होता. जगरहाटी बदलली होती. धावणाऱ्या गाड्या गर्दीचे रस्ते, निराधारता, गोंगाट या सर्व गोष्टींनी तो भयभीत झाला व परत तुरूंगाधिकाऱ्याला भेटून मला इथेच ठेवा अशी विनवणी करू लागला. तुरूंगांच्या भिंतीशेजारील मोकळया जागेत तो रात्री झोपायचा व दिवसभर खुल्या कारागृहाच्या शेतात काम करायचा तेथे त्याला भोजन मिळत असे. कालांतराने त्याच्यासाठी कोठडीचीही व्यवस्था करण्यात आली. मरेपर्यंत तो त्या तुरूंगाच्या परिघाबाहेर गेला नाही. आपले मन देखील असेच तुरूंग निर्माण करून त्यात राहू इच्छिते. त्याठिकाणी आपल्याला पीडा, त्रास, दुःख झाले तरी आपण बदल स्वीकारायला तयार नसतो. गदिमांनी म्हटल्याप्रमाणे “जग हे बंदिशाळा- जो तो येथे पथ चुकलेला” हा मनाचा स्वभाव बदलायचा कसा? कारण निसर्गात प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. स्वयंपाक स्त्रीनेच करायचा हा विचार मस्तकात पूर्णतः भिनला असल्याने पाकसूत्रे माहीत असली तरी मन त्याकडे जायला नको म्हणते.
रस्ता, चुकलेल्या कोळी व त्यांच्या बायकांची रात्री एका चांगल्या प्रशस्त बंगल्यामध्ये झोपायची व्यवस्था लोकांनी केली. पण त्यांना रात्रभर झोपच आली नाही कारण मासे ठेवणाऱ्या टोकऱ्याचा उग्र दर्प तेथे अजिबात नव्हता. अशाप्रकारे मानवी मन हे आपला तुरूंग सोडावयास तयार नसते. विवेकानंद म्हणतात “हे परमेश्वरा या जगात मी जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकद मला दे जे मी बदलू शकत नाही त्याबरोबर जुळवुन घेण्याची कुवत मला दे व मी काय बदलू शकतो व काय बदलू शकत नाही हे समजण्याचं शहाणपण देवा तू मला दे। हे साध्य करण्यासाठी मनाचा व्यायाम करणे गरजेचे आहे. कारण हजार युध्द जिंकण्यापेक्षा मनाचं एक युध्द जिंकणारा योध्दा सर्वश्रेष्ठ असतो. हे युध्द जिंकण्यासाठी व विषम परिस्थितीत आनंदाने जीवन जगण्यासाठी मनाला ध्यानाची जोड द्या. मन सबल व निर्मल करा. आपल्या तुरूंगातून, स्वनिर्मित कोषातून बाहेर पडा. आकाशात उंच भरारी घ्या.
रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे, “जिथे राम नाही- ते धाम सोडून द्या ।”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
