समोर आलेल्या कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष स करू नका. कारण कोणती वेळ कधी येईल आणि वाऱ्यासवे निघून जाईल, कळणारही नाही. छोट्यातल्याछोट्या जीवाकडूनही घेण्यासारखं खूप काही असतं. केवळ पारखणारा तसा हवा.
आजकाल कपड्यांप्रमाणे ट्रेंड्स बदलतात आणि नाईलाजाने माणूसही आणि त्यात हरवतोय तो आपलेपणा, जिव्हाळा तसेच आपुलकी..
ज्याप्रमाणे वेळ माणसासाठी थांबत नाही, तसे सांगताना अनावर होते. पण माणूसही माणसासाठी थांबायला थकलाय.
आयुष्य एक बुद्धिबळाचा पट आणि आपण त्यातले प्यादे झालोत. परंतु परिस्थितीला मांडता आलं नाही, तर तिला बदलता कसं येणार… वाईट तर वाटतेच. पण माणसातला माणूसच हरवलाय. पाठोपाठ हरवलीये ती माणुसकी आणि त्याचा परिणाम म्हणजे कोणीच कोणासाठी थांबायला तयार नाही. खेरीज स्वतःसाठी ही नाही…
त्यामुळे जसे वर्षाच्या सुरुवातीला कॅलेंडर बदलते, त्याप्रमाणे स्वतःलाही अपग्रेड करा. चांगल्या गुणांनी, चांगल्या सवयींनी, चांगल्या संगतीने, योग्य त्या प्रवासाने, योग्य त्या विचाराने. शिवाय महत्त्वाचे म्हणजे अचूक त्या निर्णयांनी सुद्धा. त्यामुळे बघता-बघता हातातून सुटून जातील अशा वस्तूंना पकडूच नका; आपला महत्त्वाचा वेळ त्यात खर्च करण्याआधी थोडे थांबा. त्याबद्दल विचार करा आणि मगच आपल्या अमूल्य अशा वेळेला आणि भावनांना त्यात गुंतवा.
आज सध्या जे आहे ते उद्या असेल का नाही, याची शाश्वती जर आपण देऊ शकत नाही, तर त्याचा काय फायदा… त्या स्वहक्काला टिकवण्यासाठी दुसरे तिसरे कोणी उभे राहील, याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःसाठी, स्वतःच्या अपेक्षांसाठी, स्वप्नांसाठी भक्कमपणे उभे राहा. त्या गोष्टी प्रत्येक्षात उतरवण्यासाठी आज एक पाऊल उचलून तर बघा. त्या थेंबाचं रूपांतर कधी एका तळ्यात होईल, असं म्हणण्यापेक्षा एका महासागरात होईल, याची मी तुम्हाला खात्री देते.
प्रयत्नांना अंत नाही ते अमर आहेत; पण थकणं आणि थांबण त्यांना मान्य नाही. तेवढं धाडस तुम्ही एकवटा मग हे भविष्य तुम्हाला वेगळ्याच पहाटेची साद घालेल. शिवाय आपल्या स्वप्नांचं… हक्काचं घरट अस्तित्वात उतरेल.
माणसं गमवायला घाबरू नका. कारण रिकाम्या जागा लवकर भरल्या जातात. स्वतःला हरवायला घाबरा. स्वतःच्या कष्टांना, मेहनतीला, एकनिष्ठपणाला हरवायला घाबरा. वेळेनुसार माणसे बदलतात, हे पूर्णपणे चुकीचे नाही. कारण बदलण हा निसर्गाचा नियम आहे. फक्त त्या बदलाचा कोणाला त्रास होणार नाही. त्यामुळे कोणी नकळत का होईना दुखावले जाणार नाही, याची जाणीव मात्र आपल्याला हवी.
जी माणसे स्वतःमध्ये वेळेसोबत बदल घडवून आणत नाहीत, ती माणसे आयुष्यामध्ये कधीच बदल घडवून आणू शकत नाहीत. आपल्यातल्या परिवर्तनानुसार आपले व्यक्तिमत्त्व बदलणार आहे, हा विचार ध्यानीमनी ठेवूनच पुढील पाऊल ठेवा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – सृष्टी पेढेकर,अकोले
