ऐकायला फिल्मी स्टाईल वाटत असलं पहिलं वाक्य तरी त्यांचं आयुष्य मात्र एखाद्या दर्जेदार सिनेमा पेक्षा निश्चित कमी नाही. मुंबई च्या फुटपाथ वर नशिबी आलेलं अनाथाचं जगणं, लोकांच्या उष्ट्या भेळपुरीच्या प्लेट मधून उचलून खरकट खाऊन काढलेले दिवस. अशातच भेटलेला एक देवमाणूस, ज्याने उचलून एका अनाथालयात टाकलं. आणि त्यांच्या विस्कळीत आयुष्याला लय लाभली.
पुढे शिकून दूरदर्शन सारख्या नामांकित संस्थेत नोकरी, नंतर लग्न, त्यावर फुललेलं वैभव नावाचं सुंदर फुल. सर्व काही सुरळीत आणि आनंदात चालू असताना अचानक कथानक बदलावं आणि त्याने अशी काही पलटी मारावी की त्यात संपूर्ण आयुष्य होत्याच नव्हतं व्हावं..😢
वैभव ला अवघ्या 16 व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला आणि काही हालचाली करायच्या आत 15 दिवसात तो हे जग सोडून निघून गेला. फळणीकर पूर्णपणे ढासळले. पहाडासारखा माणूस जमीनदोस्त झाला. आणि ठरलं पतिपत्नी दोघांनी आत्महत्या करायची. आवडीचे पदार्थ बनवले, छताला दोऱ्या बांधून तयार झाल्या, वैभव च्या चांगल्या आठवणी काढत काढत दोघे ही जेवले, सकाळी येणाऱ्या कामवालीला दरवाजा उघडायला त्रास नको म्हणून कडी ऐवजी पाटा वरवंटा आडवा लावला दाराला. पण अचानक एक नातेवाईकाचा फोन आला की मी एक तासात पोचत आहे तुमच्याकडे. फाशी घ्यायची वेळ रात्री 12 वाजता, पाहूणे 11 पर्यंत पोचणार, प्लॅन हुकतो की काय असं वाटायला लागलं, दोऱ्या काढल्या, पाहूणे गेल्यावर बघू आत्महत्येचं अस ठरलं. पाहुण्यांनी लग्नाला यायचा आग्रह धरला, यांनी ही कबुल केलं, तिकडंच रस्त्याने काही बरं वाईट करून घ्यायचा विचार मनात होताच…लग्नाला गेले.
जिव्हारी लागावा असा अपमान लग्नात फळणीकर काकूंचा झाला, “हीच पोरग मेलं आहे हिला ओटी भरू देऊ नका.” या वाक्याने दोघांच्या मनाला हजार इंगल्या डसत होत्या, एक एक श्वास जड झाला होता, केव्हा या जीवनाचा अंत होतो आणि आपण आपल्या वैभव जवळ देवाघरी जातो असं झालेलं.
मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एकाएकी फळणीकर काकी बोल्या की, “आम्हाला अपमान करायला बोलावलं का एवढ्या दूर?.” “एवढंच अपमान वाटतो तर एखाद मूल दत्तक घे..” तिकडून दुसरा वार आला, काकींच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, माझा नवरा एक काय दहा दत्तक घेईल आणि सांभाळेल… झालं.
आयुष्य जगायला कारण मिळालं, आपण अनाथ म्हणून वाढलो. मरून वैभव जवळ जाण्यापेक्षा असे अनेक वैभव रस्त्यावर फिरत आहे, त्यांना आपण जवळ केलं तर?
ठरलं…वैभवाच्याच नावाने संस्था काढली आणि एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 36 पोरांना दत्तक घेऊन त्या पोरांना हा अवलिया सांभाळत आहे. प्रत्येकात आपल्या वैभव ला पाहत आहे. त्यांना ‘आपलं घर’ देत आहे..😊😊
नगर ला गेल्यावर विजय काकाकडे जायचं आधीच निश्चित केल होतं. भेटून खूप ऊर्जा मिळाली. काकांचा आवाका खूप मोठा, मात्र पाय जमिनीवर आहेत. काकांचा काम खूप मोठं आहे, त्यावर निश्चित कधी लिहीन, तूर्तास एवढेच..🙏
विजय काकांचा संघर्ष आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या अश्याच मित्रांना सावरायला मदत करा. त्यांच्या पर्यंत हा लेख जाऊ द्या. न जाणो अजून एक विजय फळणीकर जन्माला येईल?
विजय काका फळणीकरांच्या संघर्षाला सलाम करायचा असल्यास त्यांना एक फोन किंवा मेसेज नक्की करा.
विजय काका 8275695452, 9511787241, 9850227077
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – नंदकुमार पालवे
सेवासंकल्प प्रतिष्ठान, पळसखेड
9404991927
