एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई.
अखेर एके दिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व नंतर मात्र त्याच्या हातून दार उघडे राहिले होते. त्या माणसाला अचानक काही काम आल्याने तो पिंजऱ्याचे दार उघडे टाकून निघून गेला. दार उघडेच म्हणून पोपट पिंजऱ्याच्या बाहेर निघून गेला.
पण लहानपणापासूनच पिंजऱ्यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना, कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती, म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते. पिंजऱ्यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले. पोपटाला ऊनवारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
बोध
जास्त काळ पारतंत्र्यात (गुलामगिरीत) राहिल्याने, तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
